केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरलं आहे. काँग्रेसच्या सोनिया गांधी यांना आपला मुलगा राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे, तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचं आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं ध्येय आहे असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
अमित शाह म्हणाले की, काँग्रेस पक्षाने केवळ विरोध करण्याचं काम केलं आहे. मग तो 370 चा मुद्दा असो किंवा UCC. अपमान कसा करायचा हे काँग्रेसलाच माहीत आहे. राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही पोहोचले आहेत. शनिवारपासून सुरू झालेले हे अधिवेशन दोन दिवस चालणार आहे. आज या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस. पहिल्या दिवशी संमत झालेल्या ठरावात देशाची अर्थव्यवस्था आणि मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासाविषयी चर्चा करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना अमित शाह म्हणाले की, "आज मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून कोट्यवधी भाजपा कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, पुढील निवडणुकीत दोन गट एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए आहे आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व घराणेशाही पक्षांची अहंकारी आघाडी आहे. ही आघाडी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला खतपाणी घालते आणि NDA ही राष्ट्र प्रथम या तत्त्वावर चालणारी आघाडी आहे."