नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी भाजपाचे जेष्ठ नेते तसेच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यासंह सर्व 32 आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयानंतर भाजपात उत्साहाचे वातावरण आहे. भाजापा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आडवाणी यांचे अभिनंदन केले आहे. तर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे आडवाणी यांच्या घरी पोहोचले आहेत.
तसेच, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही यासंदर्भात ट्विट करत, न्यायालयाचा निकाल यायला उशीर झाला. मात्र निकाल अगदी योग्य आला, असे म्हटले आहे.
लखनौच्या सीबीआय न्यायालयाने आज निकाल देताना, या प्रकरणावर अतिरिक्त जिला आणि सत्र न्यायाधीश एस.के. यादव यांनी सांगितले की, बाबरी मशीद ही नियोजबद्धरीतीने पाडण्यात आलेली नाही. नेत्यांनी कारसेवकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींच्या विरोधात फोटो, व्हिडीओ आणि फोटोकॉपीच्या माध्यमातून पुरावे देण्यात आले. मात्र त्यामधून काहीही सिद्ध होत नाही. तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्याविरोधात काहीही पुरावे मिळालेले नाहीत, असे सांगत न्यायमूर्तींनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
हे 32 जण न्यायालयातून निर्दोष मुक्त -आज लखनौ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ज्या 32 आरोपींना दोषमुक्त केले, यांत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, महंत नृत्य गोपाल दास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती, धरम दास, सतीश प्रधान, चंपत राय, पवन कुमार पांडेय, बृज भूषण सिंह, जय भगवान गोयल, महाराज स्वामी साक्षी, रामचंद्र खत्री, अमन नाथ गोयल, संतोष दुबे, प्रकाश शर्मा, जयभान सिंह पवेया, विनय कुमार राय, लल्लू सिंह, ओमप्रकाश पांडेय, कमलेश त्रिपाठी, गांधी यादव, धर्मेंद्र सिंह गुर्जर, रामजी गुप्ता, विजय बहादुर सिंह, नवीन भाई शुक्ला, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कक्कड आणि रविंद्र नाथ श्रीवास्तव यांचा समावेश होता.
निकालापूर्वी वेदांती म्हणाले होते रामललांसाठी फाशीलाही तयार आरोपींपैकी एक असलेले रामजन्मभूमी न्यासचे सदस्य रामविलास वेदांती (Ram Vilas Vedanti) म्हणाले होते की, 'आम्हाला विश्वास आहे, की मंदिर होते, मंदिर आहे आणि मंदिर राहील. आम्ही तो ढाचा तोडवला, याचा आम्हाला अभिमान आहे. ढाचा तोडण्याच्या आरोपात फाशी झाली, जन्मठेपेची शिक्षाही झाली, तरी आम्ही रामललासाठी जेलमध्ये जाण्यास आणि फासावर जाण्यास तयार आहोत. मात्र, रामललांना सोडण्यास तयार नाही.'
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली होती -6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेत्या उमा भारती यांच्याविरोधत होती.