संतोष ठाकूर नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्यांदा शपथविधी झाला. राष्ट्रपती भवनातील फोरकोर्ट येथे गुरुवारी पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शानदार शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २४ कॅबिनेट, नऊ राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि २४ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेणाऱ्यांत सर्वांत आश्चर्यकारक नाव अमित शहा यांचे होते. वरिष्ठत्वानुसार तिसऱ्या क्रमांकावर त्यांचा शपथविधी झाला. ते देशाचे अर्थमंत्री असतील, असे बोलले जाते.
प्रकृती ठीक नसल्याने मंत्रीपद देऊ नये, असे अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राने कळविले होते. त्यामुळे भावी अर्थमंत्री कोण असतील? अशी चर्चा होती. पीयूष गोयल यांनी वित्तमंत्रालयाचा अतिरिक्त पदभार सांभाळलेला असल्याने वित्तमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचीही चर्चा होती. अर्थमंत्री म्हणून अमित शहा यांचेही नाव चर्चेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. त्यानुसार तेच पुन्हा गृहमंत्री होतील, असे स्पष्ट संकेत मिळतात.
गृहमंत्रीपद हे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकांचे पद मानले जाते. तथापि, दोन नंबरच्या पदासंदर्भातील चर्चेदरम्यान सरकारने त्याचवेळी स्पष्ट केले होते की, पंतप्रधान सरकारचे प्रमुख असतात आणि यात नंबर दोन किंवा तीन कोणी नसते.मनेका आणि वरुण मंत्रिमंडळात नसतीलमनेका गांधी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. काँग्रेस आणि गांधी परिवाराविरुद्ध भाजप आक्रमक असल्याने त्यांना नंतर सरकारमध्ये सामील केले जाऊ शकते. एकाच परिवारातील दोघांना निवडणुकीचे तिकिट देण्याचा नियम शिथिल करून मनेका गांधी आणि वरुण गांधी यांना तिकिट देण्यात आले. तथापि, सरकारमध्ये सामील केले जाणार नाही, याच शर्तीवर त्यांना तिकिट देण्यात आले.