- संतोष ठाकूरनवी दिल्ली : देशात नक्षलवादाचा प्रश्न, सध्याचे त्याचे स्वरूप आणि त्याबाबत भविष्यातील धोरणाचा विचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २६ आॅगस्ट रोजी नक्षलवादग्रस्त सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहू असा होकार अजून कोणाकडूनही आलेला नाही. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाला पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून होकाराची विशेष प्रतीक्षा आहे. याचे कारण म्हणजे या दोन्ही राज्यांत काँग्रेसचे सरकार असून ते भाजपवर असा आरोप करीत आहे की, आमच्याकडील नक्षलवादाच्या प्रश्नांबद्दल केंद्र सरकार उदासीन आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकारच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होत नाहीत, त्यामुळे त्यांच्या होकाराची विशेष वाट पाहिली जात आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालचे सरकार यांच्यात राजकीय संघर्ष असून, केंद्र सरकारच्या अनेक योजना राज्यात बंद आहेत किंवा त्यांच्यावर विशेष काम केले जात नाही. त्यामुळे बॅनर्जी या बैठकीला येतात की नाही हे बघणे महत्त्वाचे. बैठकीचा मुख्य उद्देश हा नक्षलवादाचे सध्याचे स्वरूप समजून घेऊन त्यानुसार त्याला हाताळण्याचे धोरण बनवण्यासाठी राज्यांची सहमती घेणे आणि नक्षलवाद्यांना आधीपेक्षा कमी जागेत मर्यादित करणे. विशेषत: झारखंड, छत्तीसगड व इतर काही राज्यांत त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी नव्याने प्रयत्न करणे, धोरण आखण्यावर चर्चा केली जाईल. नक्षलवादी सतत कमी होत आहेत, पण दुसरीकडे काही शहरांत त्यांचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. हा प्रभाव फार नसला तरीही त्यावर आताच उपाय योजणे गरजेचे आहे. शहरातील नक्षलवाद्यांच्या प्रभावावरही चर्चा केली जाईल.
नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची अमित शहांनी २६ रोजी बोलावली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 5:01 AM