अमित शाहंचे (Amit Shah) एकदम खास असलेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी काल अचानक राजीनामा दिल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. आता नवा मुख्यमंत्री कोण होणार, कोणाला मंत्रिपदातून डच्चू मिळणार याची चर्चा जोरात होऊ लागलेली असताना यामागे अमित शहांचीच खेळी असल्याचे समोर येत आहे. (Why Amit Shah came In Gujrat overnight two days back? Vijay Rupani's resignation row.)
विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते परेश धानानी यांनी यावर बोट ठेवले आहे. जर महिनाभरापूर्वीच रुपाणी सरकारच्या यशाचा महोत्सव साजरा केला तर मग आता चेहरा बदलण्याची गरज का पडली, असा सवाल केला आहे. रुपाणी अपयशी ठरले त्यांचे अपयश झाकण्यासाठी भाजपाने हे सारे रचले आहे, असा आरोप त्यांनी केला.
विजय रुपाणी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एकदम विश्वासातील नेते. मात्र, तरीदेखील रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागणे हे एक कोडे बनले आहे. सूत्रांनुसार अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी अचानक रात्रीच्या सुमारास गुजरातला आले होते. यानंतर लगेचच सकाळी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली, यामध्येच रुपाणी यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. अशा वेळी सत्ताबदलाबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विजय रुपानी यांच्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक
विजय रुपानी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच, त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपानी यांना हटविण्यात आले, अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.