नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले. तर काही अद्याप जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. यातच आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रचार सभेसाठी दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या नक्षली हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, त्यांनी आज राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा सभा सुद्धा रद्द केल्या आहेत. तसेच, आजच दुपारी ते दिल्लीला परतत आहेत. दिल्लीमध्ये ते छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीविषयी चर्चा करतील. (amit shah cancels election campaign rally in assam in wake of chhattisgarh sukma naxal attack)
अमित शाह यांनी रविवारी आसाममधील आपल्या निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केला असून सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्याबद्दल ते गंभीर आहेत, अशी माहिती भाजपा नेते जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ते आज दिल्लीला परतत आहेत. आसाममध्ये प्रस्तावित अमित शाह यांच्या 3 पैकी केवळ 1 रॅलीचे आयोजन केले आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले. दरम्यान, याआधी रविवारी सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या आमच्या बहादूर सुरक्षा जवानांच्या बलिदानास मी सलाम करतो. त्याचा पराक्रम देश कधीही विसरणार नाही, असे अमित शाह यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. आम्ही शांतता आणि प्रगतीच्या या शत्रूंविरूद्ध आपला लढा सुरू ठेवू. जखमी जवान लवकरच बरे होतील, यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी या घटनेविषयी चर्चा केली असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद!छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले. सुरक्षा दलावर नक्षलवादी संघटना पीपल्स लिबरेशन ग्रुप आर्मी प्लाटून वनच्या युनिटनं केला होता. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परंतु सुरक्षा दलाचे जवान ज्यावेळी आत शिरत होते त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तीन प्रकारे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. सुरूवातीला बुले, त्यानंतर अन्य हत्यारं आणि रॉकेट लाँचरने २००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
(नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला)