Amit Shah claims BJP has already confirmed victory in 270 seats : बनगाव : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३८० पैकी २७० जागांवर पूर्ण बहुमत मिळवले आहे, असा दावा भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. तसेच, पश्चिम बंगालमधील बनगाव येथे जाहीर सभेला संबोधित करत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
अमित शाह म्हणाले, "मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. ३८० जागांसाठी निवडणूक पूर्ण झाली आहे. बंगालमध्ये १८ जागांसाठी निवडणूक पूर्ण झाली आहे. आज मी तुम्हाला सांगतोय की, ३८० पैकी २७० जागा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण बहुतम मिळवले आहे. आता ४०० चा आकडा पार करायचा आहे."
पश्चिम बंगालमधील रॅलीत अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "ममता बॅनर्जी खोटे बोलत आहेत की, जो कोणी सीएए (CAA) अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज करेल त्याला समस्यांना सामोरे जावे लागेल. मतुआ समाजातील लोकांना कोणाचीही अडचण येणार नाही, याची ग्वाही देण्यासाठी मी आलो आहे. तुम्हाला नागरिकत्वही मिळेल आणि देशात सन्मानाने जगता येईल. जगातील कोणतीही शक्ती माझ्या निर्वासित बांधवांना भारताचे नागरिक होण्यापासून रोखू शकत नाही, हे नरेंद्र मोदीजींचे वचन आहे."
अमित शाह पुढे म्हणाले की, बंगालमध्ये भ्रष्टाचार, घुसखोरी, बॉम्बस्फोट आणि सिंडिकेट राजवट आहे. ममता दीदी हे थांबवू शकत नाहीत, फक्त नरेंद्र मोदीच थांबवू शकतात. तसेच, चिटफंड घोटाळा करणारे, शिक्षक भरती घोटाळा करणारे, महापालिका भरती घोटाळा करणारे, रेशन घोटाळा करणारे, गाय आणि कोळसा तस्करी करणारे आणि पैशे घेऊन प्रश्न विचारणाऱ्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी. कोणालाही सोडले जाणार नाही, असे म्हणत अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील ममता सरकारवर निशाणा साधला.