नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपाध्यक्षअमित शहा यांनी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अमित शहा हे आपला उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड करतात, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी 13 आणि 14 जूनदरम्यान विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीत पक्षसंघटनेमधील निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. 13 आणि 14 जून रोजी होणाऱ्या बैठकीसाठी भाजपाच्या सर्व संघटन मंत्र्यांना बोलावण्यात आले आहे. पक्षसंघटनेतील निवडणुका ह्या सर्व राज्यातील संघटनांमध्ये होणार आहेत. मात्र काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणाऱ्या हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात पक्ष संघटनेच्या निवडणुका टाळण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपाच्या राज्य संघटनांच्या निवडणुका ह्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीपूर्वी होतात. दरम्यान, सध्याचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा तीन वर्षांचा अध्यक्षीय कार्यकाळ या वर्षाच्या सुरुवातीला समाप्त झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरी त्यांच्या कार्यकाळाला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे अनेक दिग्गज नेते सांगत आहेत. मात्र भाजपाकडून याबाबत अद्यापपर्यत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पक्षविस्तार करण्यासाठी भाजपाने राष्ट्रीय स्तरावर सदस्यत्व अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर बूथस्तरापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत संपुर्ण संघटनेमध्ये फेरबदल होणार आहेत. दरम्यान, भाजपाच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री जे.पी. नड्डा यांचे नाव आघाडीवर आहे. नड्डा यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने त्यांच्या निवडीच्या चर्चेला बळ मिळत आहे. मात्र अमित शहा हे पक्षाध्यक्षपदी कायम राहतील आणि त्यांच्या मदतीसाठी एक कार्यकारी अध्यक्ष निवडला जाईल, अशीही चर्चा आहे.
अमित शहा यांनी बोलावली राज्यस्तरीय नेत्यांची बैठक, पक्षनेतृत्वातील फेरबदलाबाबत चर्चा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 11:00 AM