लातेहार : झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: मैदानात उतरले असून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. झारखंडमधील लातेहारमध्ये अमित शाह यांनी अयोध्यातील राम मंदिर मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात अडथळे आणले. मात्र, अयोध्येवर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता अयोध्येत गगनाला भिडेल असे राम मंदिर बांधण्यात येईल, असे अमित शाह यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्याचा मुद्दा अमित शाह यांना उपस्थित केला. ते म्हणाले, 'काँग्रेस पार्टीने वोट बँकेसाठी हा मुद्दा 70 वर्ष लटकून ठेवला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात कलम 370 आणि 370 ए रद्द करण्याचे काम मोदींच्या सरकारने केले.'
झारखंडमधील आदिवासी मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने आदिवासींसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती अमित शाहांनी दिली. भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षात आदिवासींचा सन्मान वाढवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. सरकारने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड अंतर्गत आदिवासींसाठी 32 हजार कोटी रुपये दिले. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी पंतप्रधानांनी देशभरात प्रत्येक आदिवासी ब्लॉकमध्ये एकलव्य शाळा तयार केल्या. पाच वर्षांच्या आत देशात 438 एकलव्य शाळा तयार करण्याचे काम भाजपाने केल्याचेही अमित शाह म्हणाले.
याचबरोबर, प्रत्येकाला वाटत होते की अयोध्येत मंदिर व्हावे. मात्र, काँग्रेसने या प्रकरणाचा खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटत होते की संवैधानिक पद्धतीने हा वाद सुटवा आणि श्रीरामाच्या कृपेने सुप्रीम कोर्टाने आता निर्णय दिला आहे की त्याच जागेवर भव्य राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला आहे. देशातील सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते दिला आणि सांगितले की, अयोध्येतच श्रीरामाचा जन्म झाला होता आणि त्याठिकाणीच मंदिर तयार व्हावे, असे अमित शाह यावेळी म्हणाले.