बिजनौर - हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडून काँग्रेसनेहिंदूंना बदनाम केले. हिंदू दहशतवादी असू शकत नाही. राहुल गांधी आणि काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण केले. हिंदूंना बदनाम केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस नेहमी मतविभाजन करण्याचं राजकारण करत असतं. देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचं काँग्रेसने काम केलं. त्याचमुळे राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघ सोडून दुसरीकडे उभं रहावं लागलं. त्यांना ठाऊक आहे यंदा अमेठीतून त्यांचा हिशोब चुकता केला जाणार आहे. अमेठीच्या पराभवाला घाबरुन राहुल गांधी वायनाड येथे पळाले असा आरोप अमित शहा यांनी केला.
हिंदू दहशतवाद्यावर बोलताना अमित शहा यांनी भाष्य केलं की, हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही. हिंदू मुंगीला घास भरवतो तो लोकांना कसं मारेल ? हिंदूंना दहशतवादाशी जोडण्याचे पाप काँग्रेसने केले. राजकीय फायद्यासाठी संपूर्ण देशात गौरवशाली असणाऱ्या या हिंदू समुदायाला बदनाम काँग्रेसने केले असं शहा यांनी सांगितले. सूर्य हा तेजस्वी असतो त्याची चमक तुम्ही लपवू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला.
विरोधी पक्ष घाणेरडे राजकारण करतो. काही दिवसांपूर्वी पंचकुला येथील कोर्टाने समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला. तेव्हा काँग्रेसने समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाला हिंदू दहशतवादाचा उदाहरण असल्याचं सांगितले. त्यावेळी गृहमंत्री पी.चिंदबरम, सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी यांनी देशाला लष्कर ए तोएबापासून धोका नसून हिंदू दहशतवादापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. हिंदूंना बदनाम केल्याबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने देशाची माफी मागायला हवी. काँग्रेसने हिंदूंवर दहशतवादी असल्याचा ठपका ठेवला मात्र सत्य अखेर बाहेर पडलं असं अमित शहा यांनी सांगितले.