Amit Shah Delhi Drugs case : दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली असून, या रॅकेटमध्ये काँग्रेसचादिल्लीतील एक नेताही असल्याचे समोर आले आहे. याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ५६०० कोटींच्या प्रकरणात काँग्रेसच्या एका प्रमुख व्यक्तीचा सहभाग खूपच गंभीर आणि लज्जास्पद आहे, असे शाह म्हणाले.
अमित शाहांनी ड्रग्ज प्रकरणावर काय म्हटले आहे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात ते म्हणतात, "एकीकडे मोदी सरकारने नशामुक्त भारतासाठी झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात पकडण्यात आलेले ५६०० कोटी रुपयांच्या ड्रग्जमध्ये काँग्रेसच्या एका प्रमुख व्यक्तीचा सहभाग असणे खूपच भयंकर आणि लज्जास्पद आहे."
अमित शाह यांनी पुढे म्हटले आहे की, "काँग्रेस सरकारच्या काळात पंजाब, हरियाणा आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये तरुणांची जी अवस्था झाली, ती सगळ्यांनी बघितली आहे. मोदी सरकार तरुण पिढीला खेळ, शिक्षण आणि संशोधनाकडे घेऊन जात आहे. दुसरीकडे काँग्रेस त्यांना ड्रग्जच्या काळ्या जगात नेऊ इच्छित आहे."
"काँग्रेस नेत्याकडून आपल्या राजकीय प्रभावातून तरुणांना ड्रग्जच्या दलदलीत ढकलण्याचे जे पाप केले जाणार होते, त्यांचा हा हेतू मोदी सरकार कधीही पूर्ण होऊ देणार नाही. आमचे सरकार ड्रग्ज व्यापाऱ्यांचे राजकीय पद किंवा त्याचा प्रभाव न बघता ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करून नशामुक्त भारत करण्यासाठी कटिबद्ध आहे", असे शाह यांनी म्हटले आहे.
ड्रग्ज प्रकरणात काँग्रेसचा कोणता नेता?
दिल्लीत जप्त करण्यात आलेल्या कोकीन प्रकरणात मुख्य आरोपी तुषार गोयल असल्याचे समोर आले आहे. तुषार गोयल २०२२ मध्ये दिल्ली काँग्रेसच्या आरटीआय सेलचा प्रमुख होता. आरोपीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही आरटीआय सेल चेअरमन असा उल्लेख आहे. डिक्की गोयल नावाने सोशल मीडियावर प्रोफाईल आहे.