नापास नेत्यांची विदेशात लेक्चरबाजी - अमित शाहंची राहुल गांधींवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 12:43 PM2017-09-13T12:43:35+5:302017-09-13T12:43:35+5:30
राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले
नवी दिल्ली, दि. 13 - राहूल गांधीचे थेट नाव न घेता अयशस्वी नेत्यांनी काही सांगितलं तरी भारतात त्यांची कुणी दखलही घेत नाही अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. भारतात नापास झालेले नेते अमेरिकेत जातात आणि लेक्चर झोडतात, त्यांचं इथं भारतात कुणी ऐकत नाही, असं ते म्हणाले आणि हा राहुल गांधींचा संदर्भ असल्याचे स्पष्ट झाले. कोलकातामध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे उद्गार काढले आहेत.
राहुल गांधींनी कॅलिफोर्नियातील बर्कले या विद्यापीठात काल भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तसेच भाजपावर चांगलीच टीका केली होती. त्यानंतर भाजपा व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. देशामध्ये हिंसा, चीड आणि ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू असून असं वातावरण भारतात तयार करण्यासाठी केंद्र सरकारला राहुल गांधींनी जबाबदार धरले. भाजपाप्रणीत केंद्र सरकारवर या नव्या बदलासाठी राहुल गांधींनी ठपका ठेवला आहे. नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था 2 टक्क्यांनी आकुंचली असल्याचा आरोपही गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधींच्या मताशी असहमती दर्शवताना अमित शाह यांनी काँग्रेसप्रणीत युपीए पेक्षा विद्यमान सरकारची कामगिरी सरस असल्याचा दावा केला आहे. कार्यक्षमता हा या सरकारचा मुख्य पाया असल्याचे शाह म्हणाले. काँग्रेसच्या काळात असलेले घराणेशाहीचे राजकारण भाजपाने संपवल्याचा दावाही शाह यांनी केला. तसेच एकगठ्ठा मतांसाठी लांगुलचालन करण्याच्या धोरणाचा भाजपा स्वीकार करत नसल्याचेही शाह म्हणाले. राजकीय कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असून घराणेशाही मान्य नसल्याचे शाह यांनी सांगितले.
वाचा राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 मुद्देः
1. हिंसेमुळे कुणाचंही भलं होणार नाही
2. नोटाबंदीसंदर्भात संसदेचा सल्ला घेतला नाही
3. सत्तेत असताना अहंकार नसावा
4. मोदी सरकारनं RTI चे केले नुकसान
5. भारतात आजही रोजगाराचा प्रश्न कायम आहे. देशाला आता रोजगार निर्माण करायला हवा.
6. BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत
7. सगळी पॉवर आहे पीएमओकडे
8. भाजपाचा होता कम्प्युटरला विरोध
9. काश्मीरमधील दहशतवाद आम्ही कमी केला, मात्र भाषणं नाही केलीत
10. भाजपाप्रमाणे काँग्रेसला वरिष्ठांचा विसर नाही