नवी दिल्लीः राम मंदिर उभारणीचं काम २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल, अशी कुठलीही घोषणा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली नसल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आलाय. हैदराबादमध्ये झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीत राम मंदिराचा विषय अजेंड्यावरही नव्हता, असं ट्विट पक्षाने केलंय. त्यामुळे राम मंदिराबाबत भाजपा इतका सावध पवित्रा का घेतोय, असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
अयोध्येत राम मंदिराची उभारणी, हा गेल्या अनेक निवडणुकांमधील प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. २०१४च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'अच्छे दिन' आणि विकासाचा मुद्दा प्रमुख होता, पण 'मंदिर वही बनाएंगे' हे आश्वासनही भाजपाने दिलं होतंच. अर्थात, त्यावर गेल्या चार वर्षांत ठोस असं काहीच झालेलं नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या आधी त्यादृष्टीने हालचाली होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवरच, अमित शहा यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत केलेलं विधान आज चर्चेत आलं. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचं काम सुरू करण्याचं सूतोवाच शहा यांनी केल्याचं एका स्थानिक नेत्यानंच पत्रकारांना सांगितलं होतं. स्वाभाविकच, बातमी देशभरात पसरली आणि राजकारण सुरू झालं. त्यानंतर भाजपा एकदम बॅकफूटवर गेली आहे. अमित शहा राम मंदिराबाबत काहीच बोलले नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तरीही, यावरून सुरू झालेली चर्चा काही इतक्यात थांबेल असं दिसत नाही.