ऋषी दर्डा / हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘गेल्या निवडणुकीच्या तुलनेत राज्यात लोकसभा निवडणुकीत ४२ पेक्षा अधिक जागा जिंकू. राज्यातील वातावरण आमच्या पक्षाच्या बाजूने असून आतापर्यंत केलेले सर्व अंदाज चुकीचे ठरतील,’ असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री शाह म्हणाले की, लोकसभा निवडणूक केंद्रासाठी असून त्यात स्थानिक प्रश्न निष्प्रभ राहतील. त्यांच्या मते, पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीचा नेता नाही. त्यामुळे मोदींच्या विरोधात कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार आणि मंत्र्यांनाही लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ शकते, असे संकेत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत.
नवी दिल्लीत संध्याकाळच्या गारव्यात केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी तासभर प्रत्येक राजकीय प्रश्नाला पूर्ण उत्साहाने उत्तरे दिली. नेहमीप्रमाणे हलक्या रंगाच्या कपड्यांवर आकर्षक जाकीट परिधान केलेल्या अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. अमित शाह यांच्याशी लोकमत समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा तसेच नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी केलेल्या प्रदीर्घ चर्चेचा हा दुसरा भाग...
Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’?
प्रश्न : तुमच्या पक्षाचे वरिष्ठ आणि कनिष्ठ नेते आत्मविश्वासाने दावा करत आहेत की, भारतीय जनता पक्ष केवळ लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणार नाही, तर ३७० हून अधिक जागा जिंकेल आणि मतांची संख्याही वाढेल. या आत्मविश्वासामागे नेमके काय आहे?
उत्तर : नरेंद्र मोदीजींनी गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात ज्या पद्धतीने काम केले ते देशातील जनतेच्या हृदयात आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात २० कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेबाहेर आलेले नाहीत. आम्ही तीन कोटी लोकांना घरे दिली आहेत. पुढील पाच वर्षांत आणखी ३ कोटी लोकांना घरे देणार. याचा अर्थ येत्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे घर असेल. प्रत्येकाच्या घरात ५ किलो धान्य पोहोचत आहे. नळांद्वारे गरिबांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत आहे. त्यांच्या उपचाराचा ५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलत आहे. आम्ही घरात स्वयंपाकाचा गॅस पुरवठा केला आहे. प्रत्येक घरात स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रश्न : अनेक राज्यांमध्ये भाजपने नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. याचा वरिष्ठ नेत्यांवर परिणाम होणार नाही का?
उत्तर : तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते युवा नेते आहेत. आम्हीही आलो तेव्हा ‘वरिष्ठ नेते’ असायचे. यामागे कोणतेही कारण नाही. आवश्यकता आणि प्रतिभेसह नवीन नेत्यांचाही विचार केला जातो. ते पक्षासाठी चांगले कामही करतात.
प्रश्न : विरोधी पक्ष जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत आणि त्यांना दुसऱ्या समस्यांवर निवडणूक लढवायची आहे. तुम्ही काय म्हणाल?
उत्तर : मी म्हणेन की, देशातील ८० कोटी गरीब लोकांनी कल्पनाही केली नव्हती की, त्यांच्या घरात इतके काही होईल. विरोधक जातीबद्दल बोलतात. आम्ही विकासावर बोलतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन व्याख्या केल्या आहेत. मी फक्त एकच व्याख्या देऊ शकतो, जी आम्हाला निवडणूक जिंकून देईल, ती म्हणजे लाभार्थ्यांची जात. त्यापेक्षा जास्त काही नाही.
प्रश्न : विरोधी पक्षांमधील एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदाच अटक करण्यात आली आहे.
उत्तर : तांत्रिकदृष्ट्या पदासीन मुख्यमंत्र्यांना अटक झालेली नाही. त्यांनी राजीनामा दिला होता. मी तुम्हाला सांगतो की, लोकांना अशी संधीच मिळू देऊ नका. आधीच राजीनामा द्यावा. याआधीही अनेकांनी दिले आहेत, पण सगळ्यांनीच एवढा गदारोळ केला नाही.
प्रश्न : अशा पद्धतीने मग इतर कोणत्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा का?
उत्तर : मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. सार्वजनिक जीवनात नैतिकता असते. माझ्यावरही ‘एनकाउंटर’चा खटला दाखल करण्यात आला होता. मला अटकही झाली. मी राजीनामा दिला होता. पूर्ण सुनावणी झाली. मी सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्त झालो. राजकीय सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रश्न : एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार हेही महाराष्ट्राच्या भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत. याशिवाय राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर खटले प्रलंबित आहेत. अशा स्थितीत अजित पवारांचे तुमच्यासोबत येणे त्यांना 'क्लीन चिट' देण्यासारखे आहे का?
उत्तर : पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कोणालाही 'क्लीन चिट' दिलेली नाही. आम्ही 'क्लीन चिट' देऊ शकत नाही. त्यांच्या प्रकरणांची चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. जो त्याच्या जागी सुरू आहे. ज्याची चौकशी होणे गरजेचे आहे, त्याची चौकशी होईल. त्याचे निकाल आपसूकच येतील.
प्रश्न : कलंकित नेते सरकारमध्ये सामील झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक वातावरणाचा भाजपच्या निकालावर काही परिणाम होईल असे वाटत नाही का?
उत्तर : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलायचे झाले, तर ही निवडणूक केंद्राची निवडणूक आहे. इथे केंद्राच्या मुद्यांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल. महाराष्ट्राचा केंद्रावर परिणाम होणार नाही. ही संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदींविरोधात ‘कोण’ अशी आहे. महाराष्ट्रात शरद पवार असतील किंवा अन्य कोणी असेल, हे येणारा काळच सांगेल.
प्रश्न : गेल्या लोकसभा निवडणुकीत तुमच्या शिवसेनेसोबतच्या युतीने ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या. यात १८ शिवसेना, २३ भाजपने जिंकल्या. नंतर एक अपक्ष खासदार एनडीएमध्ये सहभागी झाल्या. यावेळी तुमचा अंदाज काय आहे?उत्तर : तुम्हाला दिसून येईल ऋषीजी, आम्ही ४२ जागांच्या पुढे जाऊ. आम्ही पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करू.
प्रश्न : पण, राज्यातून ठिकठिकाणांहून जे अहवाल येत आहेत, ते वेगळे काही सांगत आहेत?उत्तर : छत्तीसगडमधूनही तुमच्याकडे असाच अहवाल आला होता.
प्रश्न : छत्तीसगडमध्ये तुम्ही काय केले, येथेही छत्तीसगड मॉडेल असेल काय?
उत्तर : महाराष्ट्रातही वातावरण खूप चांगले आहे. आम्ही निवडणुका जिंकू. विधानसभा निवडणुकीतही आम्ही चांगली कामगिरी करू आणि सरकार स्थापन करू.
प्रश्न : यावेळी काही आमदार किंवा विद्यमान मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीची तिकिटे दिली जाणार का? रणनीती काय आहे?
उत्तर : जे उमेदवार लोकसभा निवडणुकीत जिंकून येऊ शकतात त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाईल. यासाठी आमदार, खासदार, मंत्री यांचे कोणतेही बंधन नाही. निवडणुकीत उतरण्यापूर्वी पक्षासमोर विचार करताना अनेक गोष्टी समोर येतात. ‘ऑन ग्राउंड रिपोर्ट’मध्ये दिसून आलेल्या सर्वाधिक पसंतीच्या उमेदवाराचा विचार केला जाईल. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन शक्यता निर्माण होऊ शकते.
प्रश्न : लोकसभा निवडणुकीत अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील, असा याचा अर्थ आहे का?उत्तर : यावर अद्याप निर्णय झालेला नाही. संसदीय मंडळाची बैठक होईल तेव्हा पाहू.
प्रश्न : देशातील काही राज्ये अजूनही तुमच्यासाठी चिंतेचा विषय आहेत. गेल्या वेळी दक्षिणेकडील राज्यांतील १३० जागांपैकी आपल्याला केवळ २८ जागा मिळाल्या होत्या. केरळ, तामिळनाडू, ओडिशासह पश्चिम बंगालबद्दल काय वाटते?उत्तर : यावेळी आम्ही चांगली कामगिरी करू. आमच्या जास्त जागा येतील. मतांची टक्केवारीही वाढेल. पश्चिम बंगालमध्ये तर आम्ही १८ पेक्षा खूप पुढे जाऊ शकतो आणि २५ जागा जिंकू शकतो.
प्रश्न : तुम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांना परत घेतले?उत्तर : ते तर आमच्याकडून तिकडे गेले होते. जनमत तर आमच्यासोबत होते.
प्रश्न : एकदा तिकडे जाणे आणि नंतर इकडे येणे, विश्वासार्हतेचा प्रश्न तर निर्माण होतो ना?उत्तर : कुणाच्या विश्वासार्हतेचा? आम्ही तर कुठेही गेलो नाहीत.
प्रश्न : दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची स्थिती गेल्या अनेक दशकांपासून कमकुवत आहे. रणनीतीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळीही दक्षिणेतून निवडणूक लढवू शकतात का?उत्तर : असे काही ठरलेले नाही; पण लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि 'एनडीए'साठी अतिशय चांगले वातावरण आहे.
प्रश्न : काही लोकांना असे वाटते की, पंतप्रधान मोदी यांनी दक्षिणेतून निवडणूक लढवली, तर तुम्ही दक्षिणेत मोठा विजय मिळवू शकता?उत्तर : पण पक्षात असे निर्णय होत नाहीत. दक्षिणेत आम्हाला संघटना वाढवायची आहे. आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
प्रश्न : भाजप राजकारणात नेहमीच घराणेशाहीविरोधात बोलतो; पण भाजपमध्येही अनेक नेते आणि आमदार, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? उदाहरणार्थ कर्नाटकात येडियुरप्पा आहेत.उत्तर : राजकारणात घराणेशाहीचा विचार केला, तर आमचे म्हणणे असे आहे की, पक्षाची सूत्रे एकाच कुटुंबाच्या हाती असणे. कुटुंबातील अनेक सदस्यांनी पक्षात काम केले, तर आमची हरकत नाही. कारण ते वेगवेगळ्या पदांवर असतात. अनेक लोकांच्या नियंत्रणाखाली काम करतात. त्यांच्या नियंत्रणात पक्ष असत नाही. येडियुरप्पांबाबत बोलायचे झाले, तर त्यांच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष कोण होते, तर नलीन कुमार. त्यांचा येडियुरप्पा यांच्याशी अजिबात संबंध नाही. त्यांच्या आधी मुख्यमंत्री होते बोम्मई. त्यांचाही येडियुरप्पा यांच्याशी काही संबंध नव्हता. येडियुरप्पा संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. ही काही मोठी गोष्ट नाही. हे तिघेही २०१४ च्या अगोदरपासून राजकारणात आहेत. बोम्मई मुख्यमंत्री असताना ते स्वतंत्रपणे सरकार चालवत होते. तेव्हा तुम्ही असे वृत्त दिले नाही की, येडियुरप्पा आणि बोम्मई यांच्यात मतभेद आहेत.
Highlight
प्रश्न : विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये सरकारी यंत्रणा अधिक सक्रिय असतात, असा समज आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
उत्तर : यूपीए सरकार सत्तेत असताना आम्ही अनेक जनहित याचिका दाखल केल्या होत्या. कारण आमच्याकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे होती. त्यामुळे तेव्हा न्यायालयाने आदेश दिले होते आणि एफआयआर दाखल करण्यात आले होते. आमच्यापेक्षा काँग्रेसविरोधात एफआयआर जास्त आहेत. संसदेतूनही ही माहिती मिळू शकते. जर आमचे भ्रष्टाचाराचे प्रकरण असेल तर ते आजपर्यंत न्यायालयात का सिद्ध झाले नाही. देशात लोकशाही आहे... खटले दाखल करायला पाहिजे... पण, ते हरतील. संसदेतही यावर चर्चा झाली आहे. शेवटी विरोधकांचे काम काय? अशा बाबतीत सुषमा स्वराजजी आणि अरुण जेटली हल्लाबोल करत असत, पण हे लोक संसदेत चर्चा करू शकत नाहीत, कारण खरी गोष्ट ही आहे की, तेथे काहीच नाही.
प्रश्न : काही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची रणनीती यशस्वी ठरली आहे. त्याचा भाजपच्या निवडणुकीवर परिणाम होईल का?
उत्तर : मी तसे मानत नाही. सत्तेत आल्यानंतर जो कालावधी उलटून गेला आहे, त्यात जनतेने ‘गॅरंटी’चे परिणाम पाहिले आहेत. गॅरंटी योजना इतक्या 'फुल फ्लेज' होत्या की, त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तरुणांना बेरोजगारी भत्ता मिळत नाही. प्रत्येक तहसीलमध्ये होणाऱ्या छोट्या कामांची देयके मिळत नाहीत, ती थांबली आहेत. महिलांना दोन हजार रुपये मिळत असले तरी त्यांच्या घरातील गळतीची दुरुस्ती केली जात नाही. त्यांचे बजेट बिघडले आहे. ना दुष्काळाचा पैसा, ना पुराचा पैसा. सर्व काही विस्कळीत झाले आहे. कर्नाटकातील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.