संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित, जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक-2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक-2023, या दोन विधेयकांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. हे विधेयक सध्या लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी अधीर रंजन चौधरी यांनाही बंगालसंदर्भात त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल, तेव्हा... -या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना अमित शहा यांनी कलम 370 चा उल्लेख केला. याच वेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या टिप्पणीलाही उत्तर दिले. उपहासात्मक अंदाजात शाह म्हणाले, काश्मीरातील कलम 370 हटल्यानंतर, काश्मीरमध्ये एम्स आदी सुविधा आल्या आहेत. तेथे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, हे तुम्हाला कळणार नाही दादा, बंगालमध्ये आमचे सरकार आल्यावर शांततेचे वातावरण काय असते, ते तुम्हाला समजेल. यानंतर संपूर्ण घरात हशा पिकला.
अरे यार अधीर रंजन... -याशिवाय, अमित शाह काश्मीरवर बोलत असताना विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी मधेच बोलू लागले. तेव्हा अमित शहा म्हणाले, अरे यार अधीर रंजन… यावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यानंतर, शहा म्हणाले, आपल्याला तर नियम माहित आहेत, आपण असे मधेच बोलू नये. एवढेच नाही, तर अमित शाह म्हणाले की, अधीर बाबूंही लिखित भाषण वाचायला लागले आहेत. यावर अधीर रंजन म्हणाले की, आपणही लिखित भाषणच वाचत आहात. यावर अमित शहा म्हणाले, मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात एकही लिखित भाषण वाचलेले नाही. मी केवळ तथ्यांसाठी कागदांचा आधार घेतो आणि यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचे भाषण सुरू केले.
पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, हे विधेयक गेल्या 70 वर्षात ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना पुढे नेणारे विधेयक आहे. हे विधेयक त्यांच्याच देशात विस्थापित झालेल्यांना आदर आणि नेतृत्व देण्यासाठी आहे. या विधेयकाला कोणीही विरोध केला नाही याचा मला आनंद आहे. तब्बल सहा तास चर्चा चालली ही बाबदेखील चांगली आहे, असेही ते म्हणाले.