अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:54 PM2024-05-03T21:54:31+5:302024-05-03T21:56:13+5:30
अरुण रेड्डींनी अमित शाह यांचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याचा आरोप.
Amit Shah Fake Video Row: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्या फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते अरुण रेड्डी यांना अटक केली आहे. अरुण ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सोशल मीडिया सेलचा राष्ट्रीय समन्वयक आहे, तर सुप्रिया श्रीनेट अध्यक्षा आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात अरुण रेड्डीची महत्वाची भूमिका होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण रेड्डींना दिल्लीतूनच अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर केला जाणार आहे. रेड्डी यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी त्यांचा फोन जप्त केला असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, दिल्ली पोलीस कोर्टात अमित शाह यांच्या व्हिडिओमध्ये अरुण रेड्डी यांची भूमिका उघड करणार असून, त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहेत.
Delhi Police arrest Arun Reddy, who handles the 'Spirit of Congress' X account, in the Union Home Minister Amit Shah doctored video case: Delhi Police pic.twitter.com/gB5L6Pzcbp
— ANI (@ANI) May 3, 2024
याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी तेलंगणा काँग्रेस पक्षाच्या पाच सोशल मीडिया कार्यकर्त्यांनाही अटक केली. यानंतर सर्वांना स्थानिक न्यायालयाने प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या दंडासह जामीन मंजूर केला. तसेच पुढील आदेशापर्यंत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अमित शहांच्या व्हिडिओमध्ये काय होते?
अमित शहा यांच्या प्रचार सभेतील क्लिपशी छेडछाड करुन एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अमित शहा देशातील आरक्षण संपवणार असल्याचे वक्तव्य टाकण्यात आले आहे. या संदर्भात रविवारी दिल्ली पोलिसांना दोन तक्रारी मिळाल्या होत्या, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. आयपीसीच्या कलम 153, 153ए, 465, 469, 171जी आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.