Amit Shah Fake Video Case: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या फेक व्हिडिओचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना नोटीस बजावली असून, असाम राज्यातून एका व्यक्तीला अटकही झाली आहे. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
सोमवारी(29 एप्रिल) कराडमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जे कामाच्या जोरावर लढू शकत नाहीत, ते सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ पसरवत आहेत. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून माझा आवाज, अमित शहांचा आवाज, जेपी नड्डाचा आवाज वापरुन बनावट व्हिडिओ बनवत आहेत. आमच्या तोंडी अशी वाक्ये टाकत आहेत, ज्याचा आम्ही कधी विचारही केला नसेल.
पंतप्रधानांनी पुढे दावा केला की, या लोकांना असे व्हिडीओ जारी करुन देशात तणाव निर्माण करायचा आहे. हे लोक येत्या महिन्यात काही अनुचित घटना घडू इच्छितात, ज्यासाठी हा सगळा खेळ सुरू आहे. अशा लोकांवर निवडणूक आयोग कठोर कारवाई करेल. ही क्लिप प्रत्येक लोकशाही प्रेमींना लाजवेल अशी आहे.
अमित शहांच्या व्हिडिओमध्ये काय होते?अमित शहा यांच्या प्रचार सभेतील क्लिपशी छेडछाड करुन एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अमित शहा देशातील आरक्षण संपवणार असल्याचे वक्तव्य टाकण्यात आले आहे. या संदर्भात रविवारी दिल्ली पोलिसांना दोन तक्रारी मिळाल्या होत्या, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. आयपीसीच्या कलम 153, 153ए, 465, 469, 171जी आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.