नवी दिल्ली : संघ आणि भाजपाच्या महत्त्वाच्या अजेंड्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोर्चा सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तिहेरी तलाक, काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर केल्यानंतर आता ज्यापद्धतीने लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील (Citizenship Amendment Bill) चर्चेदरम्यान अमित शाह यांनी उत्तर दिले. त्यावरून भाजपा आणि संघाचा हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून अमित शहा हेच समोर येत आहेत.
लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक अमित शहा यांनी मांडले. यावेळी चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र. यादरम्यान अमित शहा यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर अमित शहा यांनी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर दुसऱ्यांना केंद्रात भाजपा सत्तेत आल्यानंतर अमित शहा यांची जबाबदारी आणखीनच वाढली.
नव्या सरकारमधील आतापर्यंतचे तिसरे महत्वाचे नागरिकत्व सुधारणा विधेयक (जे संघाचा अजेंडा आहे) अमित शहा मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे, जम्मू- काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचे विधेयक अमित शहा यांनी राज्यसभेत मांडले. त्यावेळी सुद्धा त्यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली होती. तेव्हा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उपस्थित नव्हते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचे श्रेय अमित शहा यांना देण्यात आले. त्यानंतर भाजपा समर्थकांनी त्यांना लोहपुरुष म्हणून उपमा देत आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी अमित शहा हेच आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच पंतप्रधान होणार, अशी चर्चा सुद्धा भाजपामध्ये चर्चा सुरु झाली आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भाजपा आणि संघाचा हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जात होते.