Lalu Prasad Yadav vs Amit Shah: बिहारच्या राजकारणावरून भाजप आणि आरजेडीमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच बिहारमधील सत्ताधारी युती आणि नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याबद्दल हल्लाबोल केला. आता आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते शनिवारी म्हणाले की, अमित शाह सैरभैर झाले आहेत. त्याचबरोबर, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह लालूंनी देखील विरोधी पक्षांच्या आघाडीची गरज असल्याचाही पुनरूच्चार केला.
लालूप्रसाद यादव यांचा अमित शहांवर हल्लाबोल-
"अमित शाह पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. बिहारमध्ये त्यांचे सरकार हटवण्यात आले आहे. २०२४ मध्येही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागेल. म्हणूनच अमित शाह तिथे जाऊन जंगलराज आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. गुजरातमध्ये तुम्ही हेच केले होते का? अमित शाह गुजरातमध्ये असताना जंगलराज होते, असा माझा आरोप आहे. बिहारमधील भाजपाचे सरकार गेल्याने अमित शाह सैरभैर झाले आहेत. २०२४ मध्ये केंद्रात आणि त्यानंतर पुढील वर्षी बिहारमध्येही भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार नाही. त्यासाठी काय करायचे ते आम्ही पाहू," असे सूचक वक्तव्य लालूंनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
सत्तेसाठी नितीश कुमार राजदची देखील साथ सोडतील असे भाजपचे नेते म्हणाले होते. त्यावर लालू प्रसाद यादव म्हणाले की ते आता एकत्र आहेत. नितीश कुमार आणि लालू यादव रविवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त असलेले लालू प्रसाद यादव म्हणाले की, आम्ही विरोधी एकजुटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. हाच त्यांच्या बैठकीचा अजेंडा असेल, असेही त्यांनी सांगितले.
लालूंबद्दल अमित शाह म्हणाले होते...
"बिहारची भूमी नेहमीच परिवर्तन घडवून आणण्यात अग्रेसर राहिली आहे. भाजपशी गद्दारी करून नितीशजींनी स्वार्थ आणि सत्तेचे राजकारण दाखवून दिले. त्यांना सत्तेपासून दूर करण्याची सुरुवातही बिहारच्या भूमीतूनच होईल. आज मी सीमावर्ती जिल्ह्यात आलो आहे, त्यामुळे लालूजी आणि नितीशजींच्या पोटात दुखत आहे. मी बिहारमध्ये भांडणं लावण्यासाठी आलोय आणि जाताना काही तरी करूनच जाईन असा आरोप ते लोक करत आहेत. मला लालूजींना सांगावेसे वाटते की भांडणं लावण्यासाठी माझी गरज नाही. तुम्ही त्यासाठी पुरेसे आहात, कारण तुम्ही आयुष्यभर लोकांमध्ये भांडणं लावण्याचंच काम केलं आहे", अशा शब्दांत शाह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.