नवी दिल्ली"यूपीए सरकराने १० वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, तर मोदी सरकारने आतापर्यंत ९५ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे", असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. यात एकूण १८ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. मोदींच्या या कार्यक्रमाआधी अमित शहा यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर हल्लाबोल केला.
"यूपीएच्या काळात शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट हे फक्त २१ हजार ९०० कोटी रुपयांचं होतं. मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचं बजेट हे तब्बल ३४ हजार ३९९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे", असं अमित शहा यांनी राहुल गांधी यांना उद्देशून म्हटलं.
अमित शहा यांनी यावेळी यूपीए सरकार आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची थेट तुलनाच करत विरोधकांवर निशाणा साधला. "२००९ ते २०१४ पर्यंत यूपीए सरकारने फक्त ३ लाख ७४ हजार कोटी रुपयांचे धान आणि गहू खरेदी केली होती. आम्ही मोदी सरकारच्या काळात ८ लाख २२ हजार कोटी रुपयांचा गहू आणि धान खरेदी केलं. सध्या देशात युरियाची कुठेच कमतरता नाही. एनडीए सरकारने १० हजार शेतकऱ्यांची संघटना बनवून शहर उत्पादनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली", असं अमित शहा म्हणाले
कृषी कायद्यांचं समर्थनकृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून कुणीही शेतकऱ्याची जमीन हिरावून घेऊ शकत नाही. शेतमाल बाजार देखील सुरु राहतील. देशातील जनतेने नाकारल्यामुळे काँग्रेस गोंधळलेल्या अवस्थेत आहे, असा टोला अमित शहा यांनी लगावला.
शेतकरी संघटनांना कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे वाटत नसतील तर सरकार त्यावर सविस्तर चर्चेसाठी नेहमीच तयार आहे. शेतकऱ्यांनी तर मोदींना पूर्ण बहुमत दिलं आहे. त्यामुळे सर्व स्तरावर शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही शहा म्हणाले.