Amit Shah in Bengal: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी बीरभूम जिल्ह्यातील सिउरी येथे जाहीर सभेतून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 2024 मध्ये नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. 2024 मध्ये भाजपला 35 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर 2025 पर्यंत ममता दिदीचे सरकार राहणार नाही, असे शहा म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर अमित शाह पहिल्यांदाच बंगालमध्ये पोहोचले आहेत. बीरभूममध्ये त्यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ममता सरकारवर हिंसाचार पसरवत असल्याचा आरोप केला. दीदींच्या राजवटीत बंगाल बॉम्बस्फोटांचे केंद्र बनले आहे. भाजपचे सरकार बनवा, मग रामनवमीला हिंसाचार होणार नाही, असेही शहा यावेली म्हणाले.
यावेळी गृहमंत्र्यांनी बोगातुई हत्याकांडात मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते पुढे म्हणाले की, देशात प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्याचे काम आपल्या नरेंद्र मोदींनी केले. या बंगालच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत 77 जागा दिल्या आहेत. ही भाजपवर मोठी जबाबदारी आहे. बंगाल विधानसभेतील आमदार आणि शुभेंदू अधिकारी दीदींच्या गुंडगिरीशी लढण्याचे कार्य करत आहेत. दिदी आणि पुतण्याला पराभूत करुनच बंगालचा उद्धार होऊ शकतो, असेही अमित शहा म्हणाले.
तसेच, ममता बॅनर्जी यांना राज्यातील जनतेला आयुष्मान भारत योजना मिळवू द्यायची नाही. बंगालमध्ये एकदा भाजपचे सरकार बनवा. 8 कोटी लोकांना पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य सेवा देऊ. तुम्हाला बंगालमध्ये होणारे बॉम्बस्फोट थांबवायचे असतील, गायीची तस्करी, घुसखोरी थांबवायची असेल, घराणेशाही थांबवायची असेल, तर एकदा भाजपचे सरकार स्थापन करा. ममता दीदीची हिटलरशाही चालू देणार नाही. दीदींचा पुतण्या मुख्यमंत्री होणार नाही, पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असेही ते यावेली म्हणाले.