Amit Shah : "विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 05:33 PM2024-07-20T17:33:33+5:302024-07-20T17:51:23+5:30
Amit Shah : गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.
झारखंडसह देशातील अनेक राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेतेही राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याच दरम्यान गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे.
"एक आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींची चिंता न करता लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहेत. येणाऱ्या काळात आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे. सत्तेत आल्यानंतर आमचे सरकार लोकसंख्येच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका आणणार" असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
"पराभवानंतर अहंकार येण्याची ही पहिलीच वेळ"
"लोकशाहीत विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं. काँग्रेस अहंकारी झाली आहे. एवढा अहंकार दोन तृतीयांश बहुमताने जिंकूनही येत नाही. या निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आणि भाजपाला २४० जागा मिळाल्या" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
"बुथ कार्यकर्तेच भाजपाच्या विजयाचं कारण"
"भाजपाच्या विजयाचं कारण मंचावर बसलेले नेते नसून बूथवर उपस्थित असलेले कार्यकर्ते आहेत. काँग्रेसवर पराभव स्वीकारायला तयार नाही, कोणत्या गोष्टीचा एवढा अहंकार आहे? या देशात तुष्टीकरण करून अन्याय करण्याचा अहंकार आहे, घराणेशाहीचा अहंकार आहे, १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करण्याचा अहंकार आहे."
"मोदींनी झारखंडला नक्षलमुक्त राज्य बनवलं"
"नरेंद्र मोदींनी झारखंडला नक्षलमुक्त राज्य बनवलं आहे. हेमंत सोरेनजी, केंद्रात काँग्रेसची सत्ता, भाजपाने १० वर्षे राज्य केलं. हिशोब करून या. झारखंडच्या विकासासाठी काँग्रेसने ८४ हजार कोटी रुपये दिले होते. नरेंद्र मोदीजींनी १० वर्षात ३ लाख ८४ हजार कोटी रुपये दिले. असा झारखंड कोणी केला असेल तर तो भाजपाने केला आहे."
"काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतो"
"देशात सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असेल तर ते झारखंड मुक्ती मोर्चा आहे. एका खासदाराच्या घरातून ३०० कोटी रुपये मिळतात. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतो. ज्या व्यक्तीच्या घरातून ३०० कोटी रुपये सापडले, त्याला ते तिकीट देणार आहेत. हे घोटाळे करणारे सरकार आहे, आश्वासने मोडणारे सरकार आहे" असं म्हणत अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.