हैदराबाद: या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात दक्षिण भारतातील तेलंगणा राज्याचाही समावेश आहे. तेलंगणामध्ये भाजप मजबूत स्थितीत नाही, त्यामुळे ते आपला जनधार वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी तेलंगणातील खमाम येथे जाहिर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) सरकार आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर जोरदार टीका केली.
केसीआरशिवाय अमित शहा यांनी काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमलाही घेरले. अमित शहा म्हणाले, 'तेलंगण मुक्ती संग्रामात अनेक तरुणांनी आपले प्राण गमावले. त्यांनी रझाकारांसोबत बसण्यासाठी आपला जीव दिला नाही. गेल्या 8-9 वर्षांपासून ओवेसींसोबत बसलेले केसीआर, तेलंगणा मुक्ती संग्रामातील हुतात्मांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचे काम करत आहेत.' यावेळी अमित शहांनी केसीआर यांच्यावर घराणेशाहीचा आरोपही केला.
काँग्रेस 4G, AIMIM 3G आणि KCR यांचा पक्ष 2G: अमित शहाकेसीआर यांच्यावर आरोप करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, 'तुम्हाला तुमचा मुलगा केटीआर यांना मुख्यमंत्री करायचे आहे, हे आम्हा सर्वांना माहीत आहे. पण, यावेळी ना केसीआर होणार, ना केटीआर होणार. मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होणार.' यावेळी अमित शहांनी काँग्रेसला 4G, ओवेसींच्या पक्षाला 3G आणि KCR यांच्या पक्षाला 2G पक्ष, असे वर्णन केले.
ते म्हणाले की, 'काँग्रेस पक्ष हा 4जी पक्ष आहे. 4G म्हणजे- जवाहरलाल जी, इंदिरा जी, राजीव जी आणि आता राहुल गांधी जी. म्हणजे 4 पिढ्या असलेली पार्टी. केसीआर यांची पार्टी 2जी पार्टी आहे. KCR नंतर KTR. ओवेसींचा पक्ष 3जी पार्टी आहे, तेही तीन पिढ्यांपासून सुरू आहेत. यावेळी ना 2G येणार, ना 3G येणार, ना 4G येणार, यावेळी कमळ फुलणार.