नवी दिल्ली: सन २०१४ येईपर्यंत देशात रामराज्याची संकल्पना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. देशाची बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था अपयशी ठरली की का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, देशवासीयांनी ज्या विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात भारताची जबाबदारी सोपवली, त्याला आम्ही पात्र ठरलो आहोत. तसेच पंतप्रधान मोदींनी धैर्य आणि संयमाने घेतलेल्या निर्णयामुळे देशाने गतिमान प्रगती केली आणि जनतेचा विश्वास आम्ही सिद्ध करून दाखवला. सन २०१४ नंतर पंतप्रधान मोदी देवदूत बनून आले, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले. दिल्लीत आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते.
सन २०१४ नंतर जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचा देवदूत बनून पंतप्रधान मोदी आले. जगभरातील १७७ देशांच्या सहमतीने योग, आयुर्वेद यांचे भांडार विश्वात नेण्याचे काम केले. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संस्कृतीचे ध्वजवाहक बनून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रालाही संबोधित केले, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असायला हवी
भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात एक व्यवस्था असायला हवी. प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असायला हवी. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी तेथे अनेक महत्त्वाचे बदल केले. हळूहळू गुजरात मॉडेल देशभरात चर्चिले जाऊ लागले. योग्य आणि ठोस धोरणे, पारदर्शकता अमलात आणून गुजरातचा विकास केला, असेही अमित शाह यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
दरम्यान, नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा, ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत, असे विधान उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी केले आहे.