नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सरकारी न्यूज चॅनल संसद टीव्हीला एक विशेष मुलाखत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मिलाखत दिली. यावेळी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या लीडरशिप क्वालिटीपासून ते त्यांच्यावर होणाऱ्या टीकांपर्यंत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. (Home minister Amit Shah interview)
अमित शाह म्हणाले, पंतप्रधान मोदींनी प्रशासनातील बारकावे अगदी बारकाईने समजून घेतले आहेत. गुजरातमध्ये भाजपची स्थिती खराब असताना, पंतप्रधान मोदींनीच तेथे पक्ष उभा केला. मोदींवर होणाऱ्या डिक्टेटरशीपच्या आरोपांवर बोलताना शाह म्हणाले, ते सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतात, छोट्यातल्या छोट्या व्यक्तीचा सल्ला घेतात आणि त्यावर निर्णयही घेतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? - पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीवर विश्वास ठेवतात? या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, 'मी त्यांना अगदी जवळून काम करताना पाहिले आहे. हे सर्व लोक जे आरोप करतात, ते पूर्णपणे निराधार आरोप आहेत. मी मोदींसारखा श्रोता पाहिला नाही. कुठलीही बैठक असो, ते किमीत कमी बोलतात, अतिशय संयमाने ऐकतात आणि नंतर योग्य तो निर्णय घेतात. कधी-कधी तर आम्हालाही वाटते, की एवढा विचार सुरू आहे. पण ते प्रत्येकाचे ऐकतात आणि गुणवत्तेच्या आधारावर लहानातल्या लहान व्यक्तीच्या सूचनेलाही महत्त्व देतात. त्यामुळे, ते निर्णय लादणारे नेते आहेत, असे म्हणणे, यात काहीही तथ्य नाही.
यावर अमित शाह यांना विचारण्यात आले, की मग असा समज कशामुळे निर्माण झाला? यावर शाह म्हणाले, 'हा समज जाणूनबुजून निर्माण केला जातो. आता फोरममध्ये जी चर्चा होते, ती बाहेर येत नाही. त्यामुळे लोकांना वाटते, की मोदीजींनीच निर्णय घेतला आहे. जनतेला आणि पत्रकारांनाही माहित होत नाही, की तो निर्णय सामूहिक चिंतनातून घेण्यात आला आहे. एवढेच नाही, तर तेच निर्णय घेणार हे स्वाभाविकच आहे. जनतेने त्यांना अधिकार दिले आहेत. मात्र, सर्वांसोबत चर्चा करून, सर्वांना बोलण्याची संधी देऊन, सर्वांचे प्लस-मायनस पॉइंट्स समजून घेऊनच हे निर्णय घेतले जातात.