नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाने शानदार विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा 'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की, अमित शहा यांनी पार्टीचे अध्यक्ष पद सोडल्यास त्यांच्या जागी जेपी नड्डा यांच्याकडे पार्टीची धुरा सोपविली जाईल. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पार्टीचे अध्यक्ष अमित शहा असणार आहेत.
देशात विविध राज्यात आगामी विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपा अमित शहांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत विधानसभेसाठी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे येत्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होऊ शकते. सध्या भाजपा आपल्या सदस्यता अभियानावर भर देत आहे.
भाजपा आपल्या अभियानामार्फत 20 टक्के सदस्य वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यानंतर भाजपा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे. भाजपा खासदार भूपेंद्र यादव यांना पार्टीचे अध्यक्ष कोण होणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की, 'सदस्यता अभियान पूर्ण झाल्यानंतर पार्टीची संघटनात्मक निवडणूक केली जाईल.'
दरम्यान, महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या तिन्ही राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही राज्यात पुन्हा सरकार आण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अमित शहा हेच भाजपाचे अध्यक्ष असावेत, असे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पार्टीचे कार्यकर्त्यांना वाटत आहे.