नवी दिल्ली: मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा (manipur violence) मुद्दा विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लावून धरला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पत्राला प्रत्युत्तर दिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी केंद्र सरकारवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
खर्गेंनी पत्रात काय म्हटले?मल्लिकार्जुन खर्गे यांनी लिहिले की, 'मला तुमचे पत्र मिळाले, हे वस्तुस्थितीच्या विरुद्ध आहे. 3 मे नंतर मणिपूरमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीवर I.N.D.I.A. आघाडी सातत्याने पंतप्रधान मोदींनी बोलण्याची मागणी करत आहे. दोन्ही सभागृहात या विषयावर विस्तृत चर्चा व्हायला हवी. मणिपूरमध्ये गेल्या 84 दिवसांपासून जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ज्या प्रकारची घटना समोर येत आहे, यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात बोलणे गरजेचे आहे. अशी सर्व राजकीय पक्षांकडून अपेक्षा आहे.'
'तुम्ही लिहिलेल्या पत्रात शब्द आणि कृतीचा अभाव आहे. तुमच्या भावना पत्रातील भावनेच्या पूर्णपणे विरोधात राहिल्या आहेत. हीच वृत्ती आम्हाला गेल्या अनेक अधिवेशनांमध्ये दिसून येत आहे. छोट्या घटनांवरुन सदस्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात येत आहे. पंतप्रधान देशातील विरोधी पक्षांना ब्रिटीश आणि दहशतवादी गटांशी जोडतात आणि त्याच दिवशी गृहमंत्री भावनिक पत्र लिहून विरोधकांकडून सकारात्मक दृष्टिकोनाची अपेक्षा करतात. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील समन्वयाचा अभाव वर्षानुवर्षे दिसून येत होता, आता ही दरी सत्ताधारी पक्षांतही दिसू लागली आहे.'
पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध खर्गे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले की, 'पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना दिशाहीन म्हणणे केवळ हास्यास्पदच नाही तर दुर्दैवीही आहे. आम्ही पंतप्रधान मोदींना सभागृहात येऊन मणिपूरवर विधान करण्याची विनंती करत आहोत, परंतु असे केल्याने त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याचे दिसते. या देशातील लोकांप्रती आमची बांधिलकी आहे आणि त्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजू.'
अमित शहाचे विरोधकांना पत्र यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन माहिती दिली होती की, त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या विरोधी नेत्यांना पत्र लिहिले आहे. लोकसभेचे अधीर रंजन चौधरी आणि राज्यसभेचे मल्लिकार्जुन खर्गे या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून मणिपूर मुद्द्यावर चर्चेत अमूल्य सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे, सर्व पक्षांचे सहकार्य गरजेचे आहे. हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्ष सहकार्य करतील अशी आशा आहे, असे शहा म्हणाले होते.