Amit Shah High Level Meeting : भारताच्या पूर्वेकडील मणिपूर (Manipur) राज्यात गेल्या वर्षभरापासून हिंसाचार होत आहे. या हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी काही दिवसांपूर्वीच मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) अॅक्टिव्ह झाले असून, मणिपूरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सोमवारी (17 जून) उच्चस्तरीय बैठक बोलावली.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख (नियुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, जीओसी थ्री कोअर एचएस साही, मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी, मणिपूरचे डीजीपी राजीव राजीव सिंग आणि आसाम रायफल्सचे डीजी प्रदीप चंद्रन नायर बैठकीत सामील झाले. तसेच, मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी रविवारी(दि.16) शाह यांची भेट घेऊन राज्यातील सद्य परिस्थितीवर चर्चा केली होती.
यामुळे हिंसाचाराला सुरुवात3 मे 2023 रोजी मणिपूरमधील बहुसंख्य मेईतेई समुदायाने अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवण्याची मागणी केली होती. या मागणीच्या निषेधार्थ राज्याच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी आदिवासी समाजाने एकता मोर्चा काढला. यादरम्यान हिंसाचार उसळला आणि तेव्हापासून हा हिंसाचार शमलेला नाही. आतापर्यंत या हिंसाचारात कुकी आणि मेईतेई समाजातील 220 हून अधिक लोक आणि सुरक्षा दलांचे जवान बळी गेले आहेत.
ताजी घटनाया महिन्याच्या सुरुवातीला एका व्यक्तीच्या हत्येनंतर कोटलेनमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मेईतेई आणि कुकी, या दोन्ही समुदायातील अनेक घरे जाळली होती. मणिपूरच्या जिरीबाम भागात झालेल्या या ताज्या हिंसाचारानंतर मणिपूरच्या जिरीबाम भागातील सुमारे 600 लोक आता आसामच्या कछार जिल्ह्यात आश्रय घेत आहेत. कछार जिल्हा पोलिसांनी सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवला आहे.
मोहन भागवत काय म्हणाले होते?10 जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी वर्षभरानंतरही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागपुरात स्वयंसेवकांना संबोधित करताना भागवत म्हणाले, “मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. दहा वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये शांतता होती. तिथे बंदुक संस्कृती संपली असे वाटत होते, पण अचानक राज्यात हिंसाचार वाढला. मणिपूरमधील परिस्थितीचा प्राधान्याने विचार करावा लागेल. निवडणुकीतून वर उठून देशासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.''