नवी दिल्ली, दि. 30 - भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची देशाच्या संरक्षण मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये राजकीय वर्तूळात यासंदर्भातील चर्चेला उधाण आलं आहे. मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिल्यानंतर देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री नसल्यामुळे मोदी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना खासदारकी देऊन त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची धुरा दिली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. या मंत्रिमंडळात अमित शाह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्याचे संकेत आहेत. याशिवाय नुकतेच बिहारमध्ये एनडीएच्या साथीला आलेले नितीश कुमार, यांच्या जेडीयूलाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडेच संरक्षण मंत्रीपदाचा भार आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने त्यांना संरक्षण मंत्रीपद सोडावे लागले. पर्रिकरांना संरक्षण मंत्री करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडावं लागले होते. मात्र विधानसभेच्या निकालाने गोव्याच्या राजकारणाचे चित्र बदलेले त्यामुळे पर्रिकरांना पुन्हा संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात परतावे लागले.
शहा यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी अर्ज भरला असून केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठीच पक्षानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लावण्यास संघानेही हिरवा कंदिल दाखवला आहे. अमित शहांना गृह किंवा संरक्षण खातं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमित शहा आणि स्मृती इराणी या दोघांनाही भाजपने गुजरातमधून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात विधिमंडळात भाजपचे वर्चस्व असल्याने दोघांचीही खासदारकी निश्चित मानली जात आहे. सध्याच्या घडीला अमित शहा हे गुजरातच्या सरखेज विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. मात्र आता त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची धुरा दिली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये दुसरे कोणते मोठे नाव असेल तर ते अमित शहा हेच आहे. काही दिग्गज राजकीय जाणकारांच्या मते अमित शहांना कॅबिनेटमध्ये आणले जाईल मात्र त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद दिले जाईल असे नाही. मात्र मोदी हे धक्कातंत्राने निर्णय घेण्यात आणि टायमिंग साधण्यात प्रसिद्ध आहेत. त्याचमुळे अमित शहांच्या खासदारकी मागे वेगळी गणिते असू शकतात अशा चर्चेलाही उधाण आले आहे.