महेश्वरम(तेलंगणा): तेलंगणात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी काँग्रेस, भाजप आणि तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यातच आता भाजप नते आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर शेलक्या शब्दात खिल्ली उडवली आहे.
'KCR सचिवालयात जात नाहीत'भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या 'प्रजा संग्राम यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, "मला अशी माहिती मिळाली आहे की, के चंद्रशेखर राव राज्याच्या सचिवालयात जात नाहीत. कारण, एका तांत्रिकाने त्यांना सांगितले आहे की, जर ते तिथे गेले, तर आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव होईल. हे सांगण्यासाठी कुणा तांत्रिकाची गरज नाही. येत्या काळात जनताच तुम्हाला हाकलून देईल," अशी टीका अमित शहा यांनी केली.
'TRS चे आश्वासने पूर्ण केली नाही'ते म्हणाले की, "मला तेलंगणातील लोकांना आठवण करून द्यायची आहे की, केसीआर यांनी नीलू (पाणी), निधुलू (निधी) आणि नियामकलू (नोकऱ्या)ची आश्वासने दिली होती. यापैकी एकतरी पूर्ण झाले आहे का? आमच्या हाती सत्ता आल्यास आम्ही ती आश्वासने पूर्ण करू. आम्ही पाणी देऊ, पैसा देऊ आणि नोकरीही देऊ."
'दलित, ओबीसींचा विश्वासघात केला'शेतकऱ्यांचे प्रश्न, दलित, ओबीसींना दिलेली आश्वासने आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासावरही शाह यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते, तुम्ही 2 बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते, तुम्ही ते केले नाही. तुम्ही दलितांसाठी 50,000 कोटींचे आश्वासन दिले होते, तुम्ही प्रत्येक दलिताला तीन एकर जमीन देण्याचे वचन दिले होते, तुम्ही ते पूर्ण केले नाही.
'भाजप सत्तेत येणार'यावेळी अमित शहांनी गेल्या दोन वर्षांत दोन विधानसभा पोटनिवडणुका आणि ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्याचा उल्लेख केला आणि पुढील वर्षीच्या निवडणुकीत राज्यात भाजप सत्तेवर येण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी सुरक्षित तेलंगानासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहनदेखील केले.