नवी दिल्ली - जे कोणी भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाचे समर्थन करत नाही अशांना देशद्रोही बोललं जातं. भाजपाने देशद्रोही बनविण्याचं दुकान उघडलं आहे का? गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्याकडे बोट दाखवून धमकी दिली असा आरोप एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केला तसेच शहा हे फक्त गृहमंत्री आहेत. ते देव नाहीत. त्यांनी पहिलं नियम वाचावा असा टोला त्यांनी अमित शहांना लगावला.
लोकसभेत सोमवारी एनआयए (राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी) सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. त्यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी या विधेयकाचा विरोध करत सरकारकडून बाजू मांडणाऱ्या सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी ओवैसी यांना तुम्हाला ऐकावं लागेल अशा शब्दात सुनावले होते.
मुंबईने दहशतवादाला खूप सहन केले आहे, कारण मुंबईत नेहमीच राजकीय चश्म्यातून दहशतवाद पाहिला गेला, असे सत्यपाल सिंह आपल्या भाषणात म्हणत होते. तसेच, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी, चक्क मुख्यमंत्र्यांनी तसे न करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांना नोकरीवरुन काढून टाकण्यापर्यंतही सुनावण्यात आल्याचे सत्यपालसिंह यांनी म्हटले. त्यामुळे हैदराबादचे खासदार असुदुद्दीने औवेसी यांनी सिंह यांच्या भाषणाला आक्षेप घेतला. मात्र, अमित शहा यांनी औवेसांनी खाली बसण्यास सांगितले. तुम्हाला ऐकावचं लागेल, असे म्हणत औवेसींना टोलाही लगावला.
औवेसी साहब सुनने की ताकद रखिए, जब ए राजा बोल रहे थे तब आप क्यों नही खडे हुए, एैसे नही चलेगा, आपको सुनना भी पडेगा..असे म्हणत अमित शहा यांनी औवेसींना चांगलाच दम भरला. त्यानंतर, सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. औवेसी यांनी उभं राहून तुम्ही गृहमंत्री आहात, घाबरवू नका, मी घाबरणार नाही असं शहांना बजावलं. त्यावर अमित शहा यांनी कोणाला भीती दाखवली जाऊ शकत नाही. पण भीती मनात असेल तर त्याला काही करु शकत नाही असा टोला औवेसींना लगावला.