कोझिकोड : घुसखोरीचे १७ प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडल्यामुळे पाकिस्तानने वैफल्यातून उरीचा दहशतवादी हल्ला घडवून आणला. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानकडून थोपल्या गेलेल्या युद्धाचाच एक भाग आहे, असे सांगतानाच यात अंतिम विजय भारताचाच होईल, असा विश्वासही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत उद्घाटनाच्या भाषणात बोलताना शहा म्हणाले की, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देश तयार आहे. तथापि, उरी हल्ल्यानंतर देशात जो संताप आहे त्याला आम्ही समजू शकतो, असे सांगून शहा म्हणाले की, दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, हे केंद्र सरकार आणि भाजपचे धोरण आहे. दहशतवादाच्या अशा प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. गत आठ महिन्यात ११७ दहशतवादी मारले गेले आहेत. कारण, सरकारने दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई सुरु केलेली आहे. अमित शहा म्हणाले की, दहशतवाद्यांनी गत आठ महिन्यात घुसखोरीचे १७ प्रयत्न केले आहेत. पण, आमच्या वीर जवानांनी हे प्रयत्न हाणून पाडले. या वैफल्यातूनच उरी हल्ला झाला. आमच्या शेजारी देशाने लादलेले हे दीर्घ युद्ध आहे. उरी हल्ला याचाच एक भाग आहे. पण, हा अंतिम परिणाम नाही. अंतिम विजय आमचाच होणार आहे. या हल्ल्यातील दोषींना शिक्षा करण्याचा शब्द मोदी यांनी दिला आहे, याचा उल्लेखही शहा यांनी केला. दरम्यान, पाकिस्तानकडून अतिरेकी बुऱ्हान वाणी याचा उल्लेख शांतिप्रिय युवक असा केला गेल्याने जगही अचंबित झाले आहे. तर पाकिस्तान दहशतवादाशी कसे जोडले गेलेले आहे, याचाही हा पुरावा आहे. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे, असेही ते म्हणाले.
उरीमधील हल्ला पाकच्या वैफल्यातून : अमित शहा
By admin | Published: September 26, 2016 12:41 AM