दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्धाटन होणार आहे. हे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ मे रोजी होणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत नव्या संसद भवना संदर्भात माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'पंतप्रधान मोदी २८ मे रोजी संसदेची नवनिर्मित इमारत राष्ट्राला समर्पित करतील. ही नवीन रचना विक्रमी वेळेत करण्यासाठी सुमारे ६०,००० श्रमयोगींनी योगदान दिले आहे. यावेळी पंतप्रधान सर्व श्रमयोगींचाही सन्मान करतील.
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर विरोधकांचा बहिष्कार, १९ पक्षांकडून बॉयकॉटची घोषणा
शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 'स्वातंत्र्याच्या अमृतकाल'मध्ये काही उद्दिष्टे ठेवली होती, त्यापैकी एक म्हणजे प्राचीन परंपरेचा आदर करणे आणि त्यामुळेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन केले जाईल.'याच्या मागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. याला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात आणि याचा अर्थ संपत्तीने समृद्ध आणि ऐतिहासिक असा होतो. १४ ऑगस्ट १९४७ रोजी एक अनोखी घटना घडली. ७५ वर्षांनंतरही आज देशातील बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही.
'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. याबाबतची माहिती पीएम मोदींना मिळताच त्याची चौकशी करण्यात आली. मग ते देशासमोर ठेवायचे ठरले. त्यासाठी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस निवडण्यात आला.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'सेंगोलच्या स्थापनेसाठी संसद भवनाशिवाय दुसरे योग्य आणि पवित्र स्थान असू शकत नाही. त्यामुळे ज्या दिवशी नवे संसद भवन राष्ट्राला समर्पित केले जाईल, त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधून सेंगोल हे अध्याम स्वीकारतील आणि लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाजवळ बसवतील.