कोलकाता - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज कोलकाता येथील माया रोड येथे युवा समावेश रॅलीला संबोधित करणार आहेत. या रॅलीवरुन येथील परिसरात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर सुरु झाल्याचे दिसून येते. रॅलीच्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टर्सवर 'बंगालविरोधी भाजप चले जाव', असे नारे लिहिण्यात आले आहेत. तर, चंद्रकोना येथील भाजप समर्थकांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत.
कोलकाता येथील भाजपचे अमिताभ राय यांनी पोस्टरबाजी आणि झेंड्यांवरुन तृणमूलला लक्ष्य केले आहे. गुरुवारी रॅलीसाठी व्यासपीठाची उभारणी होत होती, त्यावेळी तृणमूलच्या काही गुंडांनी येथील कामगारांना धमकी दिली. प्रत्येक ठिकाणी तृणमूलचे झेंडे असून आम्ही त्यांना उतरवणार नाहीत. तसेच आम्ही भाजपविरोधी पोस्टर्स लावले नसल्याचेही तृणमूलचेचे महासचिव पार्थ चटर्जी यांनी म्हटले. मात्र, हे तृणमूलनेच भाजपविरोधी पोस्टर लावल्याचा दावा येथील भाजप नेत्यांनी केला आहे. तर शुक्रवारी रात्री काही अज्ञातांकडून भाजपच्या रॅलीसाठी बुक केलेल्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या गाडीतून भाजपच्या कार्यकर्त्यांना रॅलीसाठी आणण्यात येणार होते. एनआरसीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात, भाजपाध्यक्षअमित शाहंच्या रॅलीला पश्चिम बंगालमध्ये विरोध करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी म्हटल्याप्रमाणे आज अमित शाह युवा समावेश रॅली करत असून भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपला शिरकाव करायचा आहे. त्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. तर येथील 22 जागांवर विजय मिळवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे.