हरियाणा: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची 15 फेब्रुवारी रोजी हरियाणात होणारी रॅली सध्या देशभरात चर्चेचा विषय आहे. जिंद येथे होणाऱ्या रॅलीत एक लाख मोटारसायकल सहभागी होणार आहेत. त्यासाठी हरियाणातील स्थानिक भाजपा नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघातून किमान 1,111 बाईक्स आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हरियाणात एकूण विधानसभा 90 मतदारसंघ आहेत. दरम्यान, या बाईक रॅलीत सहभागी होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथही घेण्यास सांगितल्याचे कळते. यासाठी पक्षाकडून कार्यकर्त्यांना टी-शर्टस, जॅकेटस आणि भगवे हेल्मेटसचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी आम्ही 1,150 हेल्मेटस विकत घेतल्याची माहिती सोनपतमधील भाजप नेते राजीव जैन यांनी दिली. इतर मतदासंघातही या रॅलीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर टीशर्टस् वाटण्यात आले आहेत. हिसार जिल्ह्यातील एका नेत्याने कमळाचे चिन्ह असलेले तब्बल 10 हजार टी-शर्टस् विकत घेतल्याचे समजते. यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडून प्रदूषणाच्या मुद्द्यावरून या बाईक रॅलीवर आक्षेप घेण्यात आला होता. या रॅलीत तब्बल 1 लाख बाईक सहभागी होणार आहेत. परंतु, सध्या दिल्लीत प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी या बाईक रॅलीमुळे या प्रदूषणात आणखीनच भर पडेल. त्यामुळे या रॅलीतील मोटारसायकलींच्या संख्येवर निर्बंध घालावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानंतर हरित लवादाकडून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला नोटीस पाठवण्यात आली होती.
अमित शहांच्या रॅलीसाठी प्रत्येक मतदारसंघातून 1111 बाईक्स आणण्याचे टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 11:24 AM