नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष अमित शहा, भाजपा नेते रविशंकर प्रसाद आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेत्या कनिमोळी यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही नेत्यांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत अमित शहा गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर रविशंकर प्रसाद बिहारमधील पटना साहिब मतदारसंघातून आणि कनिमोळी या तामिळनाडूतील थूथुकोडी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नरेंद्र मोदी सरकारमध्ये वर्णी लागल्यास त्यांच्याकडे कोणत्या पदाची जबाबदारी दिली जाईल. तसेच, अमित शहा यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला तर पार्टीचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. यानंतर पार्टीची धुरा कोणाकडे सोपविली जाणार, याबाबत चर्चांना ऊत आला आहे.
येत्या गुरुवारी (30 मे) राष्ट्रपती भवनात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळातील स्थान मिळणार की नाही, याबाबत कळून येणार आहे. तसेच, मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नवीन चेहरे दिसून येणार आहेत.