काँग्रेस बॅकफूटवर, आता पर्दाफाश झाला; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरून अमित शाहांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 02:56 PM2024-04-24T14:56:04+5:302024-04-24T14:58:15+5:30
Lok Sabha Election 2024 : सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील वक्तव्यामुळे काँग्रेसचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला आहे. मंगळसूत्र आणि वारसा संपत्ती यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात त्यांनी अमेरिकेतील वारसा कराबाबतच्या कायद्याचं कौतुक केले. यावरून राजकीय खळबळ उडाली आहे. सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील वक्तव्यामुळे काँग्रेसचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात सॅम पित्रोदा यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी सत्य सांगितले. काँग्रेसच्या आधीच्या जाहीरनाम्यातील सर्वेक्षणात 'देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे' असे वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केले होते. आता त्यांचा जाहीरनामा बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य आले आहे, असे अमित शाह म्हणाले.
अमेरिकेचा हवाला देत सॅम पित्रोदा म्हणाले की, 55 टक्के संपत्ती सरकारी तिजोरीत जाते. आज काँग्रेसचे सत्य समोर आले आहे. त्यांना लोकांची खाजगी मालमत्ता सरकारी तिजोरीत टाकायची आहे. ती अल्पसंख्याकांमध्ये वाटून द्यायची आहे. त्यांना देशातील जनतेच्या वैयक्तिक मालमत्तेचे सर्वेक्षण करायचे आहे. त्यांची संपत्ती सरकारी तिजोरीत ठेवायची आहे. सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य जनतेने गांभीर्याने घ्यावे, असे आवाहनही अमित शाह यांनी केले आहे.
पुढे अमित शाह म्हणाले आहेत की, 'जेव्हा मोदीजींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि संपूर्ण काँग्रेस बॅकफूटवर आली होती. तसेच काँग्रेस पक्ष आपल्या जाहीरनाम्यातून हा मुद्दा मागे घेईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते की, निवडणुकीनंतर त्यांचं सरकार सत्तेवर आले, तर सर्वेक्षण केले जाईल. कोणाकडे किती मालमत्ता आहे, हे शोधून काढले जाईल.
सॅम पित्रोदा यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी अमेरिकेत वारसा कर आकारला जात असल्याचे सांगितले. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता असेल. त्यांच्या मृत्यूनंतर, 45 टक्के मालमत्ता त्यांच्या मुलांना हस्तांतरित केली जाते, तर 55 टक्के मालमत्ता सरकारची मालकी बनते, असे सॅम पित्रोदा म्हणाले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे.