चेन्नई - बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सत्तेत आल्यानंतर, भाजपची नजर आता दक्षिणेकडे वळली आहे. यासाठी स्वतः पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मोर्चा साभाळला आहे. अमित शाह यांनी शनिवारी चेन्नईतील आपल्या समर्थकांचे अभिवादन करण्यासाठी प्रोटोकॉलचीही परवा केली नाही. ते त्यांच्या गाडीतून उतरले आणि विमानतळाबाहेरील गजबजलेल्या जीएसटी रस्त्यावर पायीच चालू लागले. शाह तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी या महानगरातील लोकांनी दाखवीलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले.
दिल्लीहून येथे पोहोचल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष एल मुरुगन तथा इतर लोकांनी त्यांचे स्वागत केले. विमान तळावरून बाहेर येताच शाह यांची कार अचानकपणे थांबली आणि ते भाजप तसेच अन्नाद्रमूकच्या कार्यकर्त्यांचे अभिवादन करण्यासाठी पायीच चालू लागले.
राज्याचे मुख्य सचिव के शंमुगम, पोलीस महासंचालक जे के त्रिपाठी, चेन्नईचे पोलीस आयुक्त महेश कुमार अग्रवाल तसेच इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते. विमानतळापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या अन्नाद्रमूक तथा भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमित शाह यांचे स्वागत केले. यामुळे भाऊक होऊन शाह आपल्या गाडीतून उतरले.
शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. यावेळी, ते पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रस्तावित तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचीही शक्यता आहे. यादरम्यान शाह यांनी ट्विट करून प्रेम आणि समर्थनाबद्दल शहराचे आभार मानले. त्यांनी जीएसटी रोडवरील पदयात्रेचा व्हिडिओ पोस्ट करत ट्विट केले आहे, की तामिळनाडूत असने नेहमीच छान राहिले आहे. या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी चेन्नईचे आभार.