ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु होण्याची शक्यता फेटाळून लावली. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान परस्परांविरुद्ध खेळतील. पण पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही किंवा भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही हे अमित शहा यांनी स्पष्ट केले.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला शहा यांनी हे विधान केले. ते स्वत: गुजरात क्रिकेट संघटनेचे प्रमुख आहेत. अमित शहा तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आले असून उद्या ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचे नाव अंतिम करण्यापूर्वी अमित शहा एनडीएच्या सर्व घटकपक्षांबरोबर चर्चा करत आहेत.
शिवसेना सातत्याने सरकार विरोधी भूमिका घेऊन भाजपाची कोंडी करत असल्याने युतीच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांची ही भेट होत आहे. शिवसेना भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी असली तरी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ देण्याचे कोणतेही आश्वासन शिवसेनेने दिलेले नाही.
आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मदतीची गरज पडणार आहे. तेच या भेटीमागे खरे कारण असल्याचे राजकीय जाणकरांनी सांगितले. शिवसेनेचा पाठिंबा महत्वाचा असल्याने भाजपा शिवसेनेला अजिबात दुखावू इच्छित नाही.
मागच्या काही दिवसात शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे भाजपावर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातूनही सातत्याने नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका सुरु आहे. पण भाजपाने नरमाईची भूमिका घेत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेले नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा हेच त्यामागे खरे कारण आहे. यापूर्वी सलग दोनवेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीमध्ये असतानाही काँग्रेसला साथ दिली होती.