नवी दिल्ली : हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केल्यामुळे पुन्हा एकादा हा वाद उफाळून आला आहे. अनेक विरोधी पक्षांनी यावर तापट प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वाधिक जास्त बोलली जाणारी हिंदी भाषा आज देशाला एकसंध बांधण्याचे काम करत आहे. संपूर्ण देशात एक भाषा होणे अत्यंत गरजेचे आहे. जी जगात भारताची ओळख बनेल, असे अमित शाह यांनी सांगितले. मात्र, 'एक देश एक भाषा' या धोरणाला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे प्रमुख डीएमके स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे.
अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी सांगितले.
असदुद्दीन ओवैसी यांनी 'एक भाषा'ला हिंदुत्वाला जोडून सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी यावर ट्विट केले आहे. हिंदी प्रत्येक भारतीयाची मातृभाषा नाही आहे. तुम्ही या देशात अनेक मातृभाषा असल्याने विविधता आणि सुंदरतेची स्तुती करण्याचा प्रयत्न करणार का? असा सवाल करत अनुच्छेद 29 नुसार, प्रत्येक भारतीयाला आपल्या वेगवेगळ्या भाषेचा आणि संस्कृतीचा अधिकार असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. तसेच, भारत म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे, असा टोला त्यांनी अमित शहा यांना लगावला आहे.
ममता बॅनर्जी यांनीही ट्विटरवरुन हिंदी भाषेवरुन ट्विट केले आहे. हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत सर्व भाषांचा आणि संस्कृतीचा समान सन्मान केले पाहिजे. आम्ही अनेक भाषा शिकतो, पण आपली मातृभाषा विसरू नये, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, आम्ही सतत हिंदी भाषा लादण्यावर विरोध करत आहोत. आज अमित शाह यांच्या विधानामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. दोन दिवसांनंतर पार्टीच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल.