अहमदाबाद - भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं आहे.
'पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक असल्याने सर्जिकल स्ट्राईक होणार नाही असे लोक म्हणत होते. पण नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्या दिवशीच एअर स्ट्राईक करण्यात आला. यामध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला' असे अमित शहा यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये रविवारी (3 मार्च) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे.
एअर स्ट्राईकवरील विरोधकांचे वक्तव्य पाकिस्तानच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसेच एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन विरोधी पक्ष पाकिस्तानला संधी देत आहेत. तुम्ही मोदी सरकार आणि सैन्याच्या पाठिमागे उभे राहू शकत नसाल तर कमीत कमी शांत राहा असेही अमित शहा यांनी म्हटले आहे.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला, बरगड्यांना दुखापत
मिग 21 विमान पाकव्याप्त काश्मीर कोसळल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन दोन दिवसांपूर्वी मायदेशात परतले. त्यांच्या पाठीच्या कण्याच्या खालील भागाला आणि बरगड्यांना इजा झाली असल्याचं वैद्यकीय चाचणीतून समोर आलं आहे. लष्कराच्या रुग्णालयात अभिनंदन यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एमआरआय स्कॅनमध्ये कोणतीही दुखापत दिसलेली नाही. मात्र पाठीच्या कणाच्या खालील भागाला इजा झाली आहे. मिग 21 विमान कोसळत असताना अभिनंदन पॅराशूटच्या मदतीनं बाहेर पडले. जमिनीवर येत असताना त्यांना ही दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. पॅराशूटच्या मदतीनं जमिनीवर उतरल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांनी अभिनंदन यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. अभिनंदन यांनी स्थानिकांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याजवळ असणारी कागदपत्रं नष्ट केली.