नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळसारख्या दक्षिणी राज्यांना भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याचं आवाहन केलं आहे. दक्षिणी राज्य हा भाजपाचा गड बनेल, त्या दिशेनं काम करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कर्नाटकमध्ये आम्ही सरकार बनवलं होतं, तरीही म्हटलं जातं भाजपा दक्षिणेत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, तेलंगणा, आंध्र प्रदेश असो वा केरळ, या तिन्ही राज्यांना एक दिवस भाजपाचा गड बनवावा लागेल. तेलंगणात पक्षाच्या सदस्य मोहिमेदरम्यान अमित शाह बोलत होते.
पहिल्यांदा तेलंगणाला आपला गड बनवयाचा की आंध्र प्रदेश आणि केरळला याचा निर्णय तुम्हीच घ्या, असंही ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत. या तिन्ही राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिकची मतं भाजपाला मिळायला हवीत, असा शहाजोग सल्लाही अमित शहांनी कार्यकर्त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे भाजपाच्या सदस्य जोडणी अभियानाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात केली. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातल्या 17 राज्यांतून भाजपाच्या पारड्यात 50 टक्क्यांहून अधिकची मतं पडली होती.या राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी मोहीम राबवली होती. दक्षिण भारतात कर्नाटक सोडल्यास भाजपाला तेलंगणामध्ये फक्त 19 टक्के मतं मिळाली आहेत. पुढच्या निवडणुकीत भाजपाला या राज्यांतून 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळालीच पाहिजेत, असा निर्धारही त्यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवला आहे.