केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक राज्य मध्य प्रदेश (Madhya Pradesh Assembly Election-2023) च्या शिवपुरी येथील जाहीर सभेत काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. "तुमच्या एका मतामुळे येत्या पाच वर्षात येथे कोणाचे सरकार येणार हे निश्चित होईल. इथे एका बाजूला मध्य प्रदेशला आजारी राज्य बनवून अनेक वर्षे अंधारात ठेवणारी काँग्रेस आहे. तर दुसरीकडे 18 वर्षात शेतकरी, महिला, आदिवासी आणि तरुणांच्या कल्याणासाठी काम करणारे भाजपा सरकार आहे. काँग्रेसने येथे सत्ता असताना केवळ स्वत:चं घर भरण्याचं काम केलं. तर भाजपाने विकासासाठी काम केलं" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "मी आज कमलनाथ यांना सांगण्यासाठी आलो आहे की, जर त्यांच्यात थोडीही हिंमत असेल तर त्यांनी माझ्या प्रश्नांना उत्तर द्यावं. 2002 मध्ये त्यांनी मध्य प्रदेश सोडला तेव्हा येथील बजेट फक्त 23 हजार कोटी रुपये होते. आज भाजपाच्या 18 वर्षांच्या राजवटीत येथील अर्थसंकल्प 3 लाख 14 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. काँग्रेसने एससी, एसटी आणि ओबीसींसाठी केवळ एक हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प दिला होता. तो 64 हजार कोटींपर्यंत वाढवण्याचे काम आम्ही केलं आहे."
"पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक"
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये भारताचा गौरव करण्याचे काम केलं आहे, तर काँग्रेस पक्षाने प्रत्येक गोष्टीला विरोध केला होता. केंद्रात काँग्रेसचे मनमोहन सिंग सरकार असताना पाकिस्तानातून दहशतवादी दररोज देशात घुसून बॉम्बस्फोट घडवून आणायचे, पण सरकारने काहीही केलं नाही. मग तुम्ही मोदीजींना भरघोस जागा देऊन भाजपाचं सरकार बनवलं. 10 दिवसांतच भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. मोदीजींनी देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचे काम केले आहे."
अमित शाह म्हणाले की, "2019 मध्ये मी पक्षाध्यक्ष असताना राहुल गांधी देशभर सांगत फिरायचे की, मंदिर तिथेच बनवणार, पण तारीख सांगणार नाहीत. राहुल बाबा, तारीख कान उघडे ठेवून ऐका, 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात कमिशनचा उद्योग स्थापन केला. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या कल्याणासाठी उद्योग स्थापन केला आणि भ्रष्टाचाराचे उद्योग उभे करण्याचे काम केले."
"काँग्रेस पक्ष 4C फॉर्म्युलावर चालतो"
"कमलनाथ यांनी शिवराज सिंह सरकारच्या 51 हून अधिक गरीब कल्याणकारी योजना बंद केल्या. मात्र कमलनाथ पुन्हा आल्यास लाडली बहना योजनाही बंद होईल आणि शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळणेही बंद होईल. काँग्रेस पक्ष 4C फॉर्म्युलावर चालतो" असं अमित शाह म्हणाले.C- भ्रष्टाचार,C- कमिशन,C- जातीय दंगली,C- गुन्हेगारीचे राजकारण.मध्य प्रदेशला या 4C मधून बाहेर काढून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भाजपाला मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे असंही शाह यांनी म्हटलं आहे.