स्वरूपनगर: देशभरात कोरोनाची स्थिती गंभीर आणि भयावह होत चालली आहे. मागील सलग काही दिवस देशातील कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, बेड्सची कमतरता असून, कोरोना मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केले असून, कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन करणे शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (amit shah says appropriate behaviour of corona can not happen in kumbh and ramzan)
सध्यातरी संपूर्ण देशात लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे शाह म्हणाले होते. तसेच राज्य सरकार निर्णय घ्यायला मोकळे आहेत. राज्यात लॉकडाऊन लावण्यावर बंधन नाही, असे शाह यांनी यावेळी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमित शाह म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांच्या आढाव्यानंतर राज्यांना अधिकार देण्यात आले आहे. देशभरातील राज्ये वेगवेगळ्या पातळीवर लढाई लढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलावित असेही शाह यांनी नमूद केले.
निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ
कुंभ किंवा रमजानमध्ये नियमांचे पालन अशक्य
कुंभमेळा किंवा रमजान यांमध्ये कोरोना नियमांचे पालन केले गेले नाही. ते होऊही शकत नाही. यामुळे त्यांना आवाहन केले आणि कुंभमेळा प्रतिकात्मकरित्या साजरा करण्यात येत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. निवडणूक प्रचारसभांची वेळ कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत आम्ही ५ कोटी मास्कचे वाटप केले आहे. मात्र, प्रचारसभांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगालाच आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव
देशात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. कुंभमेळ्यातही करोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. शेकडो साधू, भाविक, संतांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांना कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली. त्यानंतर अनेक आखाड्यांनी कुंभमेळ्यातून माघार घेतली.