जगदलपूर :छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत शनिवारी झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची अमित शाह यांनी पाहणी केली. तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. (amit shah visit jagdalpur and react on Bijapur Naxalite Attack)
जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू. छत्तीसगडच्या जनतेला आणि देशवासीयांना आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने या नक्षलवादी हल्ल्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे अमित शाह म्हणाले.
जवानांचं बलिदान देश कायमच लक्षात ठेवेल
नक्षलवाद्यांविरोधात लढाई करताना या जवानांनी दिलेले बलिदान देश कायमच लक्षात ठेवेल. जवानांनी नक्षलवादाविरोधात दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील, असे सांगत गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहोचली असून, नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र झाली आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील
नक्षलवादाविरोधात लढा देण्याचं धैर्य कायम
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली असून, हा लढा सुरू ठेवला पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी जोर देऊन म्हटले आहे. यावरून आपल्या जवानांचे मनोधैर्य किती उंचावलेले आहे, ही बाब दिसून येते, असे शाह यांनी नमूद केले.
दरम्यान, छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील बस्तरच्या जंगलात सुरक्षा दलांनी एकत्रित येत नक्षलवाद्यांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. तारेम येथून निघालेल्या एका पथकाची शनिवारी दुपारी जोनागुडा गावाजवळ नक्षलवाद्यांच्या एका गटाशी धुमश्चक्री उडाली. सुमारे तीन तासांपर्यंत ही धुमश्चक्री चालली होती. या चकमकीत शहीद झालेल्या पाच जवानांचे मृतदेह शनिवारी रात्री हाती लागले होते. १७ जवान मात्र बेपत्ता होते. रविवारी सुरक्षा दलांनी जंगलात शोध मोहीम हाती घेतली असता सर्व जवानांचे मृतदेह सापडले. या चकमकीत ३० जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.