आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:59 PM2024-05-18T22:59:37+5:302024-05-18T23:00:53+5:30
Amit Shah on PoK, Lok Sabha Election 2024: "ही निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारे विरूद्ध रामभक्तांसाठी मंदिरे बांधणारे यांच्यातील लढाई"
Amit Shah on PoK, Lok Sabha Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील बांदा येथे जाहीर सभेत बोलताना समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत त्यांनी अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ही निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारे विरूद्ध रामभक्तांसाठी मंदिरे बांधणारे यांच्यातील निवडणूक असल्याचे अमित शाह म्हणाले. तसेच, पाकव्याप्त काश्मीर तर भारत आपल्या ताब्यात घेणारच, असेही अमित शाह म्हणाले.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या 'पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे' यावर प्रत्युत्तर दिले. "मणिशंकर घाबरवतात. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, पीओके मागू नका असं म्हणतात. पण आम्ही भाजपचे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही, तुम्हाला भीती असेल तर तुम्ही घाबरत बसा. पण पीओके भारताचा भाग आहे, भारताचाच राहील. आम्ही पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच," असे अमित शाह यांनी ठणकावले.
राम मंदिराच्या मुद्द्याबाबत बोलाना अमित शाह म्हणाले, "या लोकांनी व्होट बँकेचे राजकारण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अखिलेश बाबू, डिंपल भाभी, राहुल बाबा, सोनिया जी सगळ्यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना आणि अभिषेकसाठी निमंत्रण पाठवले होते, पण हे लोक आले नाहीत कारण त्यांना त्यांच्या व्होट बँकेची भीती आहे."
"त्यांची आघाडी ही कुटुंबातील सदस्यांची हातमिळवणी आहे. ते आपल्या मुला-मुलींसाठी काम करतात. शरद पवारांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, ममतांना त्यांच्या पुतण्याला मुख्यमंत्री बनवायचे आहे, सोनियाजींना त्यांचा मुलगा राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे", असा टोलाही त्यांनी लगावला.