Amit Shah vs Nitish Kumar Lalu Prasad Yadav, Bihar Politics: नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने बिहार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी फ्लोअर टेस्टवर बहिष्कार टाकला आणि सभागृहातून घोषणाबाजी करत बाहेर पडले होते. नितीश यांना २०२० मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपाने त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला असा दावा त्यांनी स्वत:च त्यावेळी केला होता. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नितीश कुमारांवर सडकून टीका केली. पंतप्रधान बनण्याच्या हव्यासापोटी नितीश यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि लालू प्रसाद यांनी भांडणं लावली असा घणाघाती आरोप शाह यांनी केला.
अमित शहा यांनी बिहारमधील पूर्णिया येथे जनभावना रॅलीत संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "पंतप्रधान होण्यासाठी नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले आणि ते आज राजद आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. पण नितीश बाबू, भारतातील जनता आता जागरूक झाली आहे. स्वार्थाने आणि सत्तेच्या कुटील राजकारणाने कोणीही पंतप्रधान होऊ शकत नाही. विकासाची कामे करून, विचारधारेशी एकनिष्ठ राहून आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित करून देशातील जनता एखाद्याला पंतप्रधान बनवते", असे अमित शाह म्हणाले.
"बिहारची भूमी नेहमीच परिवर्तन घडवून आणण्यात अग्रेसर राहिली आहे. भाजपशी गद्दारी करून नितीशजींनी स्वार्थ आणि सत्तेचे राजकारण दाखवून दिले. त्यांना सत्तेपासून दूर करण्याची सुरुवातही बिहारच्या भूमीतूनच होईल. आज मी सीमावर्ती जिल्ह्यात आलो आहे, त्यामुळे लालूजी आणि नितीशजींच्या पोटात दुखत आहे. मी बिहारमध्ये भांडणं लावण्यासाठी आलोय आणि जाताना काही तरी करूनच जाईन असा आरोप ते लोक करत आहेत. मला लालूजींना सांगावेसे वाटते की भांडणं लावण्यासाठी माझी गरज नाही. तुम्ही त्यासाठी पुरेसे आहात, कारण तुम्ही आयुष्यभर लोकांमध्ये भांडणं लावण्याचंच काम केलं आहे", अशा शब्दांत शाह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरही टीकास्त्र सोडले.