Amit Shah, BJP vs Congress: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Shah) यांच्याबाबत वादग्रस्त विधान करत त्यांची 'रावणा'शी तुलना केली. तुम्ही १०० डोकी असलेल्या रावणासारखे आहात का, अशी टीका त्यांनी मोदींबाबत बोलताना केली. साहजिकच या मुद्द्यावरून आता भाजपने समाचार घेण्यास सुरूवात केली आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला, तर गृहमंत्री अमित शहा यांनीही खर्गे यांच्या वक्तव्यावर टीका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील एका निवडणूक सभेत म्हणाले, "मोदींचा सर्वात जास्त अपमान कोण करतो, याची काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. पण एक गोष्ट लिहून ठेवा. जितका चिखल टाकाल, तितकी कमळं फुलतील. अशा विधानांबद्दल काँग्रेस नेत्यांनी खंत व्यक्त केलेली नाही हे दुर्दैव आहे असे ते म्हणाले. त्यानंतर अमित शाहांनीही खर्गेंना प्रत्युत्तर दिले. "गुजरातमध्ये जितक्या वेळा काँग्रेसने पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द वापरले, तितक्या वेळा जनतेने मतपेटीतून प्रतिसाद दिला आहे. यावेळीही मोदींच्या अपमानाला गुजरातची जनता उत्तर देईल," असे अहमदाबादमध्ये रोड शो दरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.
खर्गे नक्की काय म्हणाले होते?
सोमवारी गुजरातमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना खर्गे म्हणाले की, सर्व निवडणुकांमध्ये पंतप्रधान लोकांना 'चेहरा पाहून मतदान करा' असे सांगतात. खर्गे यांनी विचारले होते, 'तुम्ही १०० डोकी असलेल्या रावणासारखे आहात का?' त्यांच्या या विधानानंतर भाजपाने यावरून काँग्रेस आणि खर्गेंना चांगलंच सुनावलं. भाजपने ही टिप्पणी गुजरातच्या जनतेचा अपमान असल्याचे म्हटले. या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्री पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले, "काँग्रेसकडे कोणत्याही विकासाचा अजेंडा नाही. ते लोकांच्या पाठिंब्याशिवाय गुजरात आणि गुजरातींना शिव्या देत आहेत. हे विधान त्यांच्या गुजरातींच्या द्वेषाचा पुरावा आहे. अशा वर्तनासाठी गुजरातची जनता त्यांना यावेळीही नाकारेल."