परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 07:13 PM2024-10-08T19:13:47+5:302024-10-08T19:15:01+5:30

Amit Shah slams Rahul Gandhi, Assembly Election 2024: निकालानंतर दोनही राज्यांतील जनतेचे अमित शाह यांनी मानले आभार

Amit Shah slams Rahul Gandhi and said People taught a lesson to those who insulted our country by going abroad | परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह

परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह

Amit Shah slams Rahul Gandhi, Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित निकाल न मिळाल्याने यावेळी काय घडणार याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. हरयाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपाला चांगले यश मिळाले. जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला बहुमत मिळाले. पण भाजपाला इतिहासातील सर्वाधिक जागा मिळाल्या. याशिवाय हरयाणात काँग्रेसला धूळ चारत भाजपाने विजयाची हॅटट्रिक केली. या दोनही राज्यांतील निकालानंतर अमित शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली.  

शेतकऱ्यांची आणि सैनिकांची भूमी असलेल्या हरयाणाच्या जनतेने परदेशात जाऊन मतपेट्यांच्या राजकारणासाठी देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवला आहे, असा सणसणीत टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला लगावला. भाजपाला सलग तिसऱ्यांदा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल अमित शाह यांनी हरयाणाच्या जनतेचे मनापासून आभार मानले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या सर्व आकांक्षा आणि आशा पूर्ण करेल, असे वचन अमित शाह यांनी दिले.

जम्मू-काश्मीरच्या निकालाबाबत म्हणाले...

जम्मू-काश्मीरच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक मताधिक्याने आशीर्वाद दिला आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासात भाजपाला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या आहेत. यासाठी मी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मी सर्व भाजप कार्यकर्त्यांचे त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल अभिनंदन करतो. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजप जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. जम्मू-काश्मीरला दहशतवादमुक्त करणे आणि देशाच्या इतर भागांप्रमाणे विकसित करणे ही भाजपाची सर्वोच्च प्राथमिकता असेल, असा शब्द त्यांनी जनतेला दिला.

दरम्यान, हरयाणात भाजपाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे सांगितले जात आहे.

Web Title: Amit Shah slams Rahul Gandhi and said People taught a lesson to those who insulted our country by going abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.