पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर सर्वच विरोधी पक्षांनी जात जनगणना हा मोठा मुद्दा बनवला आहे. यातच, केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांनी शुक्रवारी जात जनगणनेसंदर्भात भाष्य करत, भाजप याविरोधात नाही, असे म्हटले आहे.
छत्तीसगडमधील रायपूर येथे भाजपचे संकल्प पत्र जाहीर करताना, अमित शाह म्हणाल, ''आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्ही मतांचे राजकारण करत नाही. सर्वांशी चर्चा करून जो योग्य निर्णय होईल तो आम्ही कळवू. या आधारावर निवडणूक लढवणे योग्य नाही. भाजपने याला कधीही विरोध केला नाही. अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. आम्ही योग्य वेळी सांगू.
नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या तारखांना छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या पाचही राज्यांची मतमोजणी तीन डिसेंबरला होईल.
का म्हणाले होते राहुल गांधी? -नुकतीच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले होते की, बिहारमध्ये जात निहाय जनगणना झाली. त्याच प्रमाणे आम्हीही काँग्रेस शासित राज्यांमध्ये पुढे जाऊ. आम्ही संपूर्ण देशात जात निहाय जनगणनेची मागणी करतो. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना ते इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) काम करत नाही, असे राहुल यांनी म्हटले होते.